
२५ इमारती बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल…
नालासोपारा :- महापालिकेच्या डी प्रभागच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी आचोळे पोलिसांनी वसंत नगरीच्या अग्रवाल येथील डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी आरक्षणाच्या जागेवर अखेर २५ इमारती बांधणाऱ्या बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व वसंत नगरी येथील सर्व्हे क्रमांक २२ ते ३४ या जागेवरील डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी ही जागा आरक्षित होती. २००८ मध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी या जागेचा ताबा घेऊन काही बिल्डरांना जमीन विकली होती. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने याठिकाणी चार मजल्यांच्या ४० पेक्षा अधिक इमारती बेकायदा करण्यात आल्या. या इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे राहत असून वर्षानुवर्षे कर भरत आहेत. डंपिंग आणि एसटीपी आरक्षणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. गेल्या २०२१ मध्ये कोकण आयुक्त आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारती रिकाम्या करण्याचे पत्र महानगरपालिकेला दिले होते. २५ नोव्हेंबरला डी प्रभाग समितीचे तत्कालीन सहायक आयुक्त रतेश किणी यांनी ४१ इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या लोकांना जागा सोडायची नाही. गुरुवारी सहाय्यक आयुक्त विशाखा कृष्णराव मोटघरे यांनी आरक्षणाच्या जागेवर न्यू कालिका ढाबा, पत्रा शेड, महावीर अपार्टमेंट, सनशाईन अपार्टमेंट, शुभम अष्टविनायक वेल्फेअर सोसायटी, जय महाकाल अपार्टमेंट, साई गणेश संजय अपार्टमेंट, श्रीनिवास अपार्टमेंट, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, हिरावती पॅलेस, महादेव अपार्टमेंट, एम आर अपार्टमेंट, महादेव अपार्टमेंट, रूप अपार्टमेंट, प्रियंका अपार्टमेंट, ओमसाई अपार्टमेंट, साईश्रद्धा अपार्टमेंट, रोशनी अपार्टमेंट, वास्तूनिर्माण, सिद्धिविनायक अपार्टमेंट, साई राज अपार्टमेंट, सद्गुरू कृपा अपार्टमेंट, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट आणि साई राज अपार्टमेंट या २५ इमारती कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. या २५ इमारती बांधणाऱ्या विकासकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.