
१८ ते ४५ व ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरण मोहीमेला वेग देण्यात आलेला आहे. 45 वर्षांवरील नागरीकांसोबत 01 मे पासून 18 वर्षांवरील लाभार्थ्यांनाही मोफत लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. मर्यादीत केंद्र व लसीकरणामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची गर्दी होत असून अनेक लाभार्थी दुरवरून येत आहेत. तसेच लाभार्थ्यांची गैरसोय होऊन अनेकांना लसीकरणाविना केंद्रावरून परत जावे लागत आहे. लाभार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता प्रभाग समिती जी अंतर्गत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणेची मागणी सभापती कन्हैया भोईर यांचेमार्फत आमदार हितेंद्र ठाकूर, महानगरपालिका आयुक्त तथा आरोग्य विभागास करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने अग्रवाल हॉस्पीटल येथे लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
सध्या प्रभाग समिती अंतर्गत वालीव आरोग्य केंद्र व जुचंद्र आरोग्य केंद्र या दोनच ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहेत. तसेच सोमवार, बुधवार व शुक्रवार याप्रमाणे एक दिवस आड करून प्रति दिन 200 लसी याप्रमाणे मर्यादीत लसीकरण करण्यात येते. प्रभाग समिती जी ची मोठी लोकसंख्या व विस्तृत विभाग लक्षात घेता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे नितांत गरजेचे होते.
प्रभाग समिती “जी” अंतर्गत अग्रवाल हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र सुरू करणेची सर्व कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली असून या ठिकाणी मोठे शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेडची मोठी जागा लक्षात घेता येथे १८ ते ४५ व ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी पार्टेशनव्दारे वेगवेगळी लसीकरण व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरीकांची गर्दी न होता वेगाने लसीकरण प्रक्रिया पुर्ण केली जाऊ शकेल. अग्रवाल हॉस्पीटल लसीकरण केंद्र येथे लाभार्थ्यांच्या सोई सुविधेकरीता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून खुर्च्या, पंखे तसेच थंड-गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनामार्फत येत्या 02 ते 03 दिवसात सदर लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याचे प्रभाग समिती जी चे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सांगितले. तसेच अन्य दोन ते तीन नवीन ठिकाणी आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्र सुरू करणेबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही भोईर यांनी स्पष्ट केले. लसीकरणाला वेग आल्याने परिसरातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.