
वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ या प्रभागात बीट चौक्या बसविण्याचा निर्णय मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे.
यासंदर्भात प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ येथे सुरुवातीला प्रत्येकी दोन-दोन बीट चौक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौक्यात तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी एम.एस.एफ गार्डच्याही नियुक्त्या करण्यात येणार आहेत. याठिकाणी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार असून आवश्यक त्या नोंदी करण्यासाठी रजिस्टर, मोबाईल व लॅण्डलाईन फोन, कार्यालयात आवश्यक ते फर्निचर, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रभागांतील चौक्यांवर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरला प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांनी अतिक्रमणांबाबत असलेल्या तक्रारी सदरच्या संपर्क क्रमांकावर कळवायच्या आहेत जेणेकरून तात्काळ कारवाई करणे सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे या चौक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची हालचाल नोंदवहीसुद्धा ठेवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून सुरु असलेल्या अवैध बांधकामांचा अहवाल सहाय्यक आयुक्तांना सादर करावयाचा आहे. सहाय्यक आयुक्तांनी चालू अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासीत करावयाची असून बांधकामांना नोटीस देतानाच मा.न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या सूचना मा.आयुक्त महोदयांनी दिल्या आहेत.
या चौक्यांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्या-त्या प्रभागात अनधिकृत बांधकामे होणार नाही यावर देखरेख ठेवायची असून अनधिकृत बांधकामे होताना आढळल्यास तात्काळ त्याबाबतचा अहवाल संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. या चौक्यांना प्रभाग अधिकाऱ्यांनी रोज भेट द्यायची असून विभागीय उप-आयुक्त यांनी एक दिवसाआड तर उप-आयुक्त, अतिक्रमण विभाग यांनी आठवड्यातून दोनदा व अतिरिक्त आयुक्तांनी आठवड्यातून एकदा भेट द्यायची आहे, असे निर्देश मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार यांनी दिले आहेत.