
◆ परप्रांतीय मजुरांचे लोंढे UP,MP च्या दिशेने रवाना !
◆ शासनाच्या नियोजनशून्ह कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती ?
◆ किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे मजूर हतबल !
वसई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांचा आकडा २३ हजारावर पोचला आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परराज्यातील मजुरांचे लोंढेच्या लोंढे मूळगावी जाण्यासाठी बाहेर पडू लागले आहे.मुंबई,पुणे,नागपूर या महानगरांसह वसई विरारही कोरोनाचे केंद्र बनले आहे.त्यामुळे वसई विरार सध्या रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे येथील परिस्थिती लवकर पूर्ववत होण्याच्या अशा धूसर बनल्या आहेत.
मात्र यामुळे वसईमध्ये औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुसरीकडे राज्य सरकारने या मजुरांसाठी वसई मधून श्रमीक ट्रेनची व्यवस्था केली आहे. परंतु ती तोकडी असल्याने अनेकांनी मिळेल त्या वाहनाने जाण्यास सुरवात केली आहे.अनेक कामगारांनी रखरखत्या उन्हात पायपिट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला आहे. एकीकडे शासन मजूरांना सुरक्षित घरी पोहचवण्याच्या वल्गना करत आहे. परंतु यासाठी कोणतेच नियोजन नसल्याने या मजुरांना अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागत आहे.मजुरांच्या या मजबुरीचा फायदा मात्र अनेक ट्रक, टेम्पो चालक घेऊ लागले असून चक्क अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली
त्यांची जीवघेणी वाहतूक सुरु असलेल्या निदर्शनास येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वाहतूक करताना कोणतीच सोशल डिस्टेनिंग न पाळता या गाडीमध्ये कोंबले जात आहे. एका गाडीतून तब्बल ७० मजुरांची वाहतूक केली जात असल्याने सोशल डिस्टेनिंगचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.अशा प्रकारे बिनदिक्कतपणे या मजुरांची वाहतूक होत असूनही या गाड्यांची कोणतीच तपासणी केली जात नसल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रत्येक गाडीमागे तपासणीनाक्यावर आर्थिक देवाण घेवाण होत असल्याने गाडीत काय आहे याबाबत कोणतीच चौकशी न करताच पुढे पाठवले जात आहे.आतपर्यंत हजारो वसई विरार मधून परप्रांतीय मजुरांचे लोंढे उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश च्या दिशेने रवाना झाले आहेत.
दोनशे रुपयात वैद्यकीय सर्टिफिकेट-
मूळगावी परतणाऱ्या या मजुरांना कोणतीच तपासणी न करता दोनशे रुपयात वैद्यकीय सर्टिफिकेट देण्यात देत आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या बोगस सर्टिफिकेटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकाराबाबत युवाशक्ती एक्सप्रेसने वसई विरार पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे संपर्क साधला.परंतु संबंधित अधिकारी काझी मॅडम या गेल्या १० दिवसांपासून नॉट रीचेबल असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे मजुरांची दिशाभूल करून खाजगी डॉक्टरांकडून लूटमार सुरु असताना पालिकेचा वैद्यकीय विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.एकीकडे वसई विरार मध्ये कोरोना हातपाय पसरत असताना पालिकेला मात्र कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
हजारो रूपये घेऊन ट्रान्सपोर्ट चालकांनी कामगारांना धरले वेठीस-
दुसरीकडे या मजुरांची ट्रान्सपोर्ट चालकांकडूनही लूटमार सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने या कामगारांसाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था केली असली तरी याची नोंदणी प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्याने मूळगावी जाण्यासाठी बहुतांश मजुर ट्रक, टेम्पो तसेच रिक्षांचा आधार घेत आहेत.या मजुरांकडून प्रत्येकी ३५०० एवढे भाडे वसूल केले जात आहे.वसई विरार मधून आतपर्यंत अंदाजे २ लाखहुन अधिक मजुरांची नोंदणी झाली आहे. परंतु आतापर्यंत वसईतून केवळ ३ ते ४ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. एका ट्रेनमध्ये जेमतेम अकराशे जणांनाच प्रवेश देण्यात येत असल्याने अजूनही नोंदणी केलेले हजरो मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.एकप्रकारे सरकारच्या धीम्या प्रक्रियेमुळे हे कामगार हतबल झाले आहेत.