

वसई (वार्ताहर) : बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज, सोमवारी पार पडलेल्या निवडणूकित “आपलं पॅनल”चे युवा संचालक रायन फर्नांडीस यांचा पाच मतांनी विजय झाला. फर्नांडिस यांना ११ तर प्रतिस्पर्ध्या “प्रेरणा पॅनल”चे उमेदवार आर्नोल्ड ऑलविन जिगुल यांना ६ मते मिळाली.बँकेच्या पापडी येथील मुख्यालयात नव्या अध्यक्षासाठी आज सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डी. एस. हौसारे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
देशातील पहिल्या दहा नागरी सहकारी बँकात गणली जाऊन, राज्यातील नागरी शेड्युल्ड बँकेत अग्रेसर समजल्या जाणारी बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँक लवकरच राज्याबाहेर सीमोल्लंघन करणार आहे. सुमारे ९२ हजाराहून अधिक सभासद आणि राज्यभर ६४ शाखा मार्फत गेली १०३ वर्षे ग्राहक सेवा देणाऱ्या बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात रु. १७३ कोटींचा नफा कमावला असून, या बँकेचा मिश्र व्यवसाय रु.११ हजार १७५ कोटी पर्यंत पोहचला आहे. १०३ वर्षांपूर्वी एका ख्रिस्ती धर्मगुरूने पतपेढीच्या रूपात सुरु केलीली ही बँक वसईतील ख्रिस्ती समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
या बँकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत समाजवादी नेते मनवेल तुस्कानो आणि काँग्रेस नेते स्व.मायकल फुर्ट्याडो यांनी एकत्र येऊन “आपलं पॅनल” उभे केले होते. त्यांच्याशी लढत द्यायला बँकेच्या माजी अध्यक्षा डॉमनिका डाबरे आणि ज्येष्ठ संचालक डॉमनिक डिमेलो यांनी “प्रेरणा पॅनल” उतरवले होते. या निवडणुकीत “आपलं पॅनल”ने बहुमत काबीज करून “प्रेरणा पॅनल” चा पराभव केला होता.
त्यानंतर पहिल्या अध्यक्षपदाचा मान “आपलं पॅनल” चे नेते, तथा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. मायकल फुर्ट्याडो यांना देण्यात आला होता. दुर्दैवाने मायकल फुर्ट्याडो यांचा बँकेच्या ऐन शताब्दी वर्षात अकाली मृत्यू झाला. त्यानंतर सचिन परेरा यांना काही काळ अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर समन्वयाच्या सूत्रानुसार अध्यक्षपदाची धुरा ओनील आल्मेडा यांच्या हाती देण्यात आली. निवडी समयी निश्चित झाल्यानुसार ओनील आल्मेडा यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांच्या रिक्त जागी रायन फर्नांडीस यांच्या रूपाने उच्चंविद्याविभूषित असे नवे नेतृत्व उदयास आले आहे. यावेळी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अग्नेलो पेन, उपाध्यक्ष युरी घोन्साल्विस, माजी अध्यक्ष मनवेल तुस्कानो, ओनील आल्मेडा, डॉमनिक डिमेलो, सहाय्यक महाव्यवस्थापक
साहेबराव पाटील, इग्नेशियस फर्नांडीस, फिलिप कोलासो, पॅट्रिक फर्नांडीस आदी मान्यवर उपस्थित होते.
योगायोगाचा भाग असा की, रायन फर्नांडीस यांची अध्यक्षपदी निवड होऊन त्यांनी आपल्या पंजोबांचा वारसा पणतूच्या रूपाने पुढे चालविला आहे. रायन यांच्या मातोश्री सौ.फिलिपा फर्नांडीस यांचे रिझर्व्ह बँकेत अधिकारी असलेले आजोबा स्व.डी.जे. गोन्साल्वीस यांची सन १९२० साली बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी, या बँकेचे दुसरे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि ते सुमारे पंधरा वर्षे या पदावर कार्यरत होते. तसेच रायन यांचे पिता इग्नेशियस फर्नांडीस यांनीही बँकेवर तीन टर्म संचालक आणि एकदा उपाध्यक्षपद भूषवले आहे.
आपल्या निवडी नंतर प्रतिक्रिया देताना, अध्यक्ष रायन फर्नांडीस म्हणाले, नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधणीस लवकरच प्रारंभ करून, ती पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. बँकेने ओरॅकल फायनान्सशियल सर्व्हिसेस या आंतरराष्ट्रीय कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे लवकरच खाजगी बँकांप्रमाणे ग्राहकास जलद आणि अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी नवी कोअरबँकिंग प्रणाली सुरु करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत