
लोकशाही म्हणजे लोकांनी लोककरवी लोकांसाठी चालविलेले राज्य हा प्राथमिक धडा नागरिक शास्रात प्रत्येकाला मिळाला असेलच. आपण मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड केली म्हणजे आपले कार्य संपले असे होत नाही.
तर अश्या लोकप्रतिनिधी व प्रशासनावर जनतेचा अंकुश असणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी लोकप्रतिनिधींना परत बोलावून फेरनिवड करण्याची तजवीज नाही. पण प्रशासनाला त्यांच्या चुका दाखविणे अथवा योग्य कामे करून घेणे आणि कररूपाने वसूल केलेला जनतेचा पैसा सत्कारणी लागतो की नाही हे पाहणे आपण विविध माध्यमातून करू शकतो. बऱ्याच वेळा त्यात यश ही येते. पण काही वेळा आपल्या संयमाची परीक्षाही होते !
हे एक ताजे उदाहरण! वसईतील सुरुची बाग येथे एक गृह प्रकल्प निर्माण होत आहे. मुंबई व परिसरातील लोकांना तिथे येण्यासाठी आता नायगाव उड्डाणपूल सोयीस्कर ठरणार आहे. त्या बांधकाम व्यावसायिकाने राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील बापाणे फाटा ते सुरूची बाग येथील रस्त्यावर त्यांच्या प्रकल्पाचे नाव असलेले दिशादर्शक जाहिरात फलक पालिकेचे विद्युत खांब व इतर ठिकाणी लावले होते. ह्या बद्दलची विचारपूस व तक्रार सामाजिक कार्यकर्ता श्री दिलीप अनंत राऊत, उमेळे ह्यांनी वसई विरार शहर महानगर पालिकेच्या जाहिरात विभागाकडे ई-मेलने दि. ३० मे ,२०२२ रोजी केली. त्यांनी बहुतेक त्याची दखल घेतली असावी व ते फलक काढून टाकण्यात आले आहेत!
मनपाच्या जाहिरात विभागाला धन्यवाद देताना त्यांना ह्याची पण जाणीव श्री दिलीप अनंत राऊत ह्यांनी करून दिली की अश्या अनधिकृत जाहिराती शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे हे आपल्या खात्याचे कर्तव्य व जबाबदारी आहे!( मागे अश्याच प्रकारच्या जाहिरातींना श्री दिलीप राऊत ह्यांनी आक्षेप घेऊन त्या काढून टाकण्यात आल्या होत्या. किंबहुना त्यांच्या मते त्यांनी केलेल्या पहिल्या तक्रारी नंतर एक विशेष गट तयार करून मनपाने त्यांचे जाहिरात धोरण तयार केले. म्हणून आता जाहिराती खाली कंत्राटदाराने नाव व समाप्तीची तारीख दिसून येत आहे!!)