

प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगर पालिका हद्दीत अंदाधुंद अनधिकृत बांधकामे झाली असून अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सक्त आदेश जारी करताच प्रभाग समिती एफ कडून गुरुवारी मोठी कारवाई करून ३२ हजार चौरस फूट बांधकामे निष्कासित केली गेली. अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी सदरची कारवाई केली.
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत लाखोंच्या संख्येने अंदाधुंदपणे अवैध बांधकामे झालेली आहेत. अवैध बांधकामांच्या असंख्य तक्रारी महानगर पालिका कार्यालयासह मंत्रालयापर्यंत गेल्या आहेत. त्याचप्रमाणे न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी दि. १२.१.२०२१ रोजी अनधिकृत बांधकामे व त्यावरील कारवाई संदर्भात सक्त आदेश जारी केला. अनधिकृत बांधकामावर २४ तासात कारवाई व बांधकामधारकांवर एमआरटीपी गुन्हे दाखल करावी. सहाय्यक आयुक्तांनी सदर बाबत कारवाई न केल्यास सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
प्रभाग समिती एफ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी धडाकेबाज कारवाई करीत ३२ हजार फूट बांधकामे भुईसपाट केली. सदर बांधकामधारकांवर लवकरच एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील असे मोहन संखे यांनी सांगितले.
मोहन संखे यांनी पदभार स्वीकारताच हि धडाकेबाज कारवाई केली.
दरम्यान अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी जारी केलेल्या आदेशाने भूमाफियांचे व भ्रष्ट सहाय्यक आयुक्तांचे धाबे दणाणले आहेत.