
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यापासून बेकायदा बांधकामांची जंत्री मोठ्या प्रमाणात वाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम प्रगतीपथावर असताना अवैध शाळांनी दुकान मांडले आहे. संपुर्ण पालघर जिल्ह्यात एकूण 190 अवैध शाळा असून त्यात विद्यार्थ्यांकडून दामदुपटीने पैसे वसूल केले जात आहेत. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार्या अनधिकृत शाळांवर कारवाई व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात मागण्या करण्यात येत होत्या. आज अखेर शिक्षण विभागाने कारवाईला प्रारंभ करताना वसई परिसरातील 18 शाळांना दणका दिला. अवैध शाळांचे सर्वाधिक प्रमाण हे वसई-विरार परिसरात आहे. त्यादृष्टीने वसई, विरार, नालासोपारा परिसरातील एकूण 18 शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कायम विनाअनुदानित या तत्वावर शिक्षणाचा बाजार तथाकथित शिक्षणसम्राटांनि सुरू केला आहे. ज्या अवैध शाळा आहेत त्या शिक्षणाऐवजी केवल व्यवसय्यिक दृष्टीकोन समोर ठेवून सुरू करण्यात आल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो. खालावलेली शिक्षणपद्धती याला अवैध शाळा जबाबदार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण यात मोठे आहे. मातृभाषेतील शिक्षणाची गळचेपी करत इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढता ओढा आहे. शिक्षणप्रारंभाचे वय याआधी जे 6 वर्षाचे होते ते अवघे साडेतीन वर्षापर्यंत आणून ठेवून लहानग्यांचे बालपण पुर्णपणे लयास नेले आहे. वसई-विरार परिसरात एकून 150 शाळा अवैध आहेत. या शाळांकडे एक नजर टाकली तर त्याकिठाणी शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे दिसून येईल. अवैध शाळांवर कारवाई म्हणून शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने शिक्षण विभागाने पेल्हारमधील 13, विरारमधील 5 अशा एकूण 18 अवैध शाळांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कारवाईच्या पुढील टप्प्यात पेल्हार, वसई, मालजीपाडा याठिकाणी झालेल्या अवैध शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
अवैध शाळा कोठे, किती?
संपूर्ण वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात सुमारे 150 अवैध शाळा आहेत. पालघरमध्ये 17, वाडा तालुक्यात 10, जव्हार तालुक्यात 1, मोखाड्यात 1, डहाणूत 3, विक्रमगडमध्ये 5, तर तलासरीत 2 याप्रमाणे पालघर जिल्ह्यात एकूण 190 शाळा अनधिकृत आहेत.
