

वसई : कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा सर्वात मोठा फ़टका चिकन आणि मटण व्यवसायाला बसला होता. कोरोना प्राण्यातून संक्रमित होतो म्हणून चिकन आणि मटणचा भाव थेट जमिनीला येऊन भिड़ला होता. मटण 200; तर चिकन 40 रूपयांवर आले तरी खवय्यांचा चिकन आणि मटण खायला धीर होत नव्हता. मात्र कोरोना प्राण्यातून संक्रमित होत नाही; हे स्पष्ट झाल्यानंतर चिकन आणि मटणचे भाव मात्र चांगलेच वधारले. याचेच परिणाम म्हणून वसईत बोकड़ाचे मटण ८०० रुपये किलो; तर चिकनने २२० रूपयांवर भरारी घेतली आहे. मात्र आता चिकन आणि मटणचा भाव जास्तीत जास्त किती असायला हवा, याबाबत सरकारने आणि स्थानिक पालिका प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी करावी, अशी मागणी वसई-विरारकरांनी केली आहे.
लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तुंची असलेली अनुलब्धता आणि चिकन आणि मटण यांची वाढलेली माग़णी लक्षात घेऊन वसई-विरार शहरात चिकन आणि मटणचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी चिकन आणि मटणच्या दुकानांवर सोशल डिस्टनसिंगचे नियम धुडकावत प्रचंड गर्दी झालेली दिसली. याचा फायदा उठावत चिकन आणि मटण दुकानदारांनी ग्राहकांची लूट केल्याची तक्रार आहे.
वसई-कोळीवाडा येथे तर बोकड ८०० रुपये; तर चिकन २२० रुपये किलो दराने विकले जात होते. ही लूट थांबवण्यासाठी चिकन किंवा मटण यांचे दर नेमके किती असावेत; याची मार्गदर्शक सूचना प्रशासनाने करावी; अशी मागणी वसई-विरारमधील नागिकांनी केली आहे.