
विरारच्या अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमधल्या तरणतलावात बुडून एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या रिसोर्टमध्ये जीवरक्षकही नव्हता अशीही माहिती समोर आली आहे. आफिया असे बुडून मृत्यू झालेल्या सात वर्षीय मुलीचे नाव आहे.
मालवणी मध्ये रहाणारा २१ जणांचा एक ग्रुप शुक्रवारी सकाळी विरारच्या सागर रिसॉर्टमध्ये आला होता. त्यामध्ये १५ मोठ्यांचा आणि ६ लहान मुलांचा समावेश होता. सकाळी नाश्ता झाल्यानंतर काहीजण रिसॉर्टमधल्या तरणतलावात पोहण्यासाठी उतरले होते. अब्दुला शेख हे त्यांच्या पत्नीसह आणि सात वर्षांच्या मुलीसह पाण्यात उतरले होते. ते पाणी पिण्यासाठी काही वेळाने बाहेर आले. त्यांच्यापाठोपाठ त्यांची पत्नीही पाण्याबाहेर आली. त्यावेळी पाण्यात असलेली आफिया बुडू लागली. हा प्रकार इतर पर्यटकांना लक्षात आला. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. आफियाला अर्नाळा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
