फादर फ्रान्सिस दिब्रिटो

लातूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto) यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीत रविवारी 77 वर्षीय दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन मराठवाड्यात करण्यात आल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती होईल, असं मानलं जात होतं. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ आणि साहित्यिक रा. रं. बोराडे यांची नावं शर्यतीत होती.

बोराडेंनी मराठवाडा साहित्य परिषदेला लेखी, तर रसाळ आणि महानोर यांनी तोंडी नकार दिला. चपळगावकरांनीही पत्र पाठवून आपल्या नावाचा विचार न करण्याची सूचना दिली. त्यामुळे फादर दिब्रिटो (Father Francis D’britto) यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा परिचय

दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो 1983 ते 2007 या काळात ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते.

फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं आहे.

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु असले, तरी पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने स्वतंत्र ठसा उमटला.

‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto) यांचे प्रकाशित साहित्य

आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव)
तेजाची पाऊले (ललित)
नाही मी एकला
संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
सुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
सृजनाचा मोहोर
परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
मुलांचे बायबल (चरित्र)
ख्रिस्ती सण आणि उत्सव
पोप दुसरे जॉन पॉल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *