साडेचार कोटींच्या नुकसान भरपाई मध्ये जास्तीत जास्त वाटा मिळवून देण्याचे वचन देऊन शेतकऱ्याकडून तब्बल साठ लाख पंच्याहत्तर हजाराचे कमिशन खाण्याचा प्रयत्न अंगलट

मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी सुरू असणाऱ्या भूमी संपादन प्रक्रियेत जमीन मोजणीचे काम करणाऱ्या तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला बनावट नकाशे बनवण्यासाठी पैशाचे आमिष देण्याचा अश्लाघ्य प्रकार आगरी नेते श्री. कैलास हरी पाटील यांनी केला.

ह्या आमिषाला सदरचा कर्मचारी बळी पडत नाही असे दिसल्यावर त्याच्या वसई येथील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दालनात धिंगाणा करून मोजणी प्रकरणांच्या फायली ह्या कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकून त्याला नागडे करून मारण्याची धमकी देण्यापर्यंत पाटील यांची मजल गेली.

घडलेल्या प्रकाराबद्दल सदरच्या कर्मचाऱ्याने वसई पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक १२/२०२०, भा.द.वि.स. कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद केलेली असून पुढील तपास सुरू असल्याचे वसई पोलिस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक श्री कल्याणराव कर्पे यांनी सांगितले आहे

विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली, तो कर्मचारी देखील आगरी समाजाचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने भूमीपुत्राच्या नावांनी कंठशोष करणाऱ्या काकांचा खरा चेहरा उघड झाल्याचे सांगितले जाते.

शासकीय कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी श्री कैलास पाटील कुख्यात असल्याचे आणि तालुका भूमी अभिलेख कार्यालयात घडलेल्या प्रकारासारख्या घटना यापूर्वी देखील अनेक वेळा महानगरपालिकेतील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्गासोबत घडल्याचे सांगितले जात आहे.

अवघ्या दोनच वर्षांपूर्वी प्रभाग समिती “क” चे सहाय्यक आयुक्त श्री गिल्सन गोन्साल्विस व बांधकाम अभियंता श्री. आर. के. पाटील यांना दिवाणमान येथील एका प्रकरणात गैर कायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिवीगाळ प्रकाराच्या विरोधात महापालिकेच्या तब्बल दीड हजार कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन देखील केले होते. मात्र पाटील यांच्यावर असणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *