विजय पाटील हे सध्यस्थित काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव

वसई : प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या समाजाच्या मतांचा विसर कोणत्याही पक्षाला पडत नाही. जास्तीत जास्त आगरी समाजाची मते आपल्या बाजूने वळावित म्हणून अनेकदा पक्षीय स्तरावर प्रयत्नदेखील होतात. यावेळी मात्र आगरी समाज स्वतंत्र बाण्याने विधानसभेच्या रणांगणात उतरणार असल्याच्या हालचाली आगरी सेनेच्या वतीने सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रथम पाऊलच आगरी सेनेने पालघर जिल्ह्यात उचलले असून त्यादिशेने सेनेने आता कामकाजाला सुरूवात केली आहे. नुकतेच पालघर जिल्ह्यात आगरी सेनेच्या वतीने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी तसेच पक्षवाढीसाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात नव्या चेहर्‍यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात आगरी सेना कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात असून वसई विधानसभेसाठी मात्र आगरी सेना उत्सूक असल्याचे दिसून येते.

विजय पाटील की कैलास पाटील?
वसई विधानसभा मतदारसंघातून विजय पाटील हे यंदा निवडणूक लढणार असल्याचे चित्र रंगवले जात आहे. विजय पाटील हे सध्यस्थित काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या नावाची काँग्रेस पक्षाने घोषणा केल्यास आगरी सेना पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार हे मात्र नक्की. तसेच दुसरीकडे आगरी सेना अध्यक्ष राजाराम साळवी यांचे जावई तसेच सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील यांचे नाव देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहे. विधानसभेसाठी आता विजय पाटील की कैलास पाटील हे निवडणुक काळात स्पष्ट होणार आहे.

पदाचा गैरवापर करणार्‍यांना डच्चू
आगरी सेनेने नुकतेच आयोजित केलेल्या एका मेळाव्यात एका पदाधिकार्‍याला जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली होती. मात्र हा पदाधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी संबंधित पदाधिकार्‍याला पदावरून डच्चू दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षीय स्तरावर आमच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभेसाठी सध्या विजय पाटील आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहेत. निवडणुक काळात उमेदवाराचे नाव जाहीर होऊन आगरी सेना पूर्ण ताकदनिशी उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील.
जनार्दन पाटील
-अध्यक्ष : पालघर जिल्हा, आगरी सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *