
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची संकल्पना सत्यात उतरली
पालघर जिल्ह्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक शाखेची संकल्पना अमलात आणली व या शाखेचे उद्घाटन अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. 2014 पासून आजतागायत पालघर जिल्ह्यासाठी वाहतूक शाखा अस्तित्वात नव्हती ती अस्तित्वात आणण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पालघर जिल्हा स्थापन झाल्यापासून जिल्हा मुख्यालय पालघर येथे अस्तित्वात आले. त्यानंतर जिल्ह्याची कामे घेऊन नागरिक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले यामुळे वाहन कोंडींसह इतर प्रकारच्या वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत होती. याच बरोबरीने रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होत होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करण्याचे नियोजन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले. त्यानुसार अलीकडच्या काळात त्यांनी या वाहतूक शाखेच्या कार्यप्रणालीचा आराखडा तयार करून तो मंजूर करून घेतला त्यानंतर या वाहतूक शाखेची निर्मिती करून दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडून या शाखेची सुरुवात केली गेली.
जिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती करून या शाखेसाठी सहायक पोलिस निरीक्षक आसिफ बेग यांच्यावर विभाग प्रमुखांची जबाबदारी दिली गेली. त्यांच्यासह एकूण ५३ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली. वाहतूक शाखेसाठी नेमणूक करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी वर्गाचे ०७ दिवसांचे वाहतूकीबाबतचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले असून उर्वरीत २१ पोलीस अंमलदारांचे प्रशिक्षण हे या आठवड्यात पुर्ण करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे प्रत्यक्षात कामकाज हे आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सुरू करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रमुख दळणवळणाची शहर असलेल्या ठिकाणी या शाखेतील वाहतूक कर्मचारी वाहतुकीचे नियंत्रण व त्या संबंधाची व्यवस्था पाहणार आहेत. वाहतुकीचे काटेकोर नियम पाळण्यासाठी ते नागरिकांना आवाहन करणार आहेत. याच बरोबरीने बेकायदा पार्किंग वाहतुकीचे नियम तोडणे अशा प्रकारांवर दंडात्मक कारवाई करणे अशा प्रकारचे काम वाहतूक नियंत्रण शाखा जिल्हाभर करणार आहे या शाखेमुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. या शाखेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपअधीक्षक शैलेश काळे, नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी विश्वजीत बुलबुले तर जिल्हा विशेष शाखेचे अनिल विभुते व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते