

विरार(संजय राणे)– नालासोपारा येथील रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९च्या १३ रुग्णाना आतापर्यंत वसई-विरार महापालिकेकडून ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असून; याचा खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी तब्बसुम काझी यांनी दिली.
तूर्तास रिद्धिविनायक रुग्णालयाकडून या इंजेक्शनचा वापर करण्यात येत असला तरी महापालिका ही इंजेक्शन्स मागवून रिद्धिविनायक रुग्णालयाला रीप्लेस करणार असल्याने या इंजेक्शनचा खर्च रुग्णाकडून घेऊ नये, अशी विनंती रुग्णालयाला करण्यात आली असल्याचे तब्बसुम काझी यांनी सांगितले.
कोविड-१९ चा रुग्ण प्रथम अथवा द्वितीय टप्प्यात असेल तर बरा होतो; मात्र रुग्ण तृतीय टप्प्यात गेल्यास त्याला वेंटिलेटर, आयसोलेशन आणि टॉसिलिझमैब या इंजेक्शनशिवाय पर्याय राहत नाही, परंतु टॉसिलिझमैब इंजेक्शनची बाजारात सुरू असलेली काळाबाजारी लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने या इंजेक्शन्सचा संचय करून दारिद्रय व मध्यम वर्गीय रुग्णाना ही इंजेक्शन्स कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास या रुग्णाना दिलासा मिळेल. त्यामुळे या इंजेक्शन्सचा पालिकेने संचय करून ठेवावा, अशी मागणी निमेश वसा यांनी केली होती.
मात्र या इंजेक्शन्सचा संचय केला जाऊ शकत नसल्याची खंत काझी यांनी व्यक्त केली. त्यामुळे गरज लागले तशी या इंजेक्शन्सची मागणी केली जाणार असल्याच्या त्या म्हणाल्या. आतापर्यंत पालिकेने पाहिल्या टप्प्यात सिप्ला कंपनीकडे १० इंजेक्शन्सची मागणी केली होती; मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही इंजेक्शन्स उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे ही गरज पूर्ण होताच पुढे लागणाऱ्या इंजेक्शन्सची मागणी रुग्णालयाच्या फिजिशियनचे मत लक्षात घेऊन केली जाईल.
रुग्णाचा संपूर्ण तपशील रुग्णालयाकडून सादर केल्यानंतरच कंपनीच्या डिस्ट्रिब्यूटरकडून ही इंजेक्शन रुग्णाच्या नातेवाईकांकड़े सुपूर्द केली जातात. त्यामुळे या इंजेक्शन्सचा संचय केला जाऊ शकत नसल्याचेही काझी म्हणाल्या.
‘टॉसिलिझमैब’ या इंजेक्शनची ‘एमआरपी’ किंमत ४५ हजार रुपये इतकी आहे. मात्र खासगी हॉस्पिटल व डिस्ट्रीब्यूटर हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही सांगून रुग्णाना वेठीस धरतात; मात्र मागच्या खिड़कीतून हेच इंजेक्शन ७० ते ८० हजार रुपयांना रुग्णाना विकतात. हे सामान्य रुग्णाना परवडणारे नसल्याने, ही इंजेक्शन्स किमान किमतीत दारिद्रय व मध्यम उत्पन्न गटातील रुग्णाना मोफत उपलब्ध करून द्यावीत; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता निमेश वसा यांनी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीमुळे गरीब रुग्णाना दिलासा मिळाला आहे.