
● जिल्हा प्रशासनाने तयार केले मोबाईल अँप
सचिन जगताप,पालघर,प्रतिनिधी,दि.6 फेब्रुवारी
पालघर जिल्ह्यातील खाडी समुद्रकिनारे व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन करून गौण खनिजाची तस्करी सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अशा अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी क्लुप्ती लढवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मोबाईल ॲप ची निर्मिती केली असून या ॲपद्वारे अशा बेकायदा उत्खननाला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
पालघर जिल्हयात, वैतरणा रेल्वेपुल परीसरात व सागरी किनारा परिसर तसेच इतर ठिकाणी, खाडी नदी पात्रामध्ये, आजुबाजूच्या परिसरामध्ये होत असलेल्या अवैध वाळू-रेती उत्खनन व वाहतूक रोखण्याच्या अनुषंगाने कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांना आता घरबसल्या थेट तक्रार करता येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मोबाईल ऍप तयार केले आहे. Illegal Sand Mining App नावाचे ॲनरॉईड मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आलेले असून सर्वसामान्य नागरिक अवैध उखननाविरोधात तक्रारी करू शकतात.तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्याची दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. हे ऍप गुगल प्लेस्टोरवर जनसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारचे बेकायदा, अवैध उत्खनन व वाहतूकी बाबतच्या तक्रारी नागरिक आता करू शकतात त्यामुळे अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी हे ऍप प्रभावी आहे. नागरिकांनी बेकायदा वाळू-रेती उत्खनन याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी केले आहे.