

मुंबई : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर किती तरी वेळा त्यांच्या संपर्कात येतात. त्यातील एक तपासणी म्हणजे स्टेथोस्कोपने तपासणी. ज्या रुग्णांपासून आपण सर्व जण दूर राहत आहोत, मात्र डॉक्टरांना या रुग्णांच्या जवळ राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. करोना विषाणूची लागण संसर्गजन्य असल्याने गेल्या काही दिवसात डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना घडत आहेत.
कोरोना बाधित रुग्णांना श्वसनसंबंधी समस्या असतात. त्यामुळे त्यांचे हृदयाचे ठोके आणि छातीतील आवाज ऐकण्यासाठी ते आतापर्यंत जो स्टेथोस्कोप वापरला जातो तो वापरत आहेत. त्यासाठी त्यांना रुग्णाच्या जवळ जावं लागतं आणि त्यांनाही कोरोनाव्हायरसचा धोका बळावतो. आता हाच धोका कमी करण्यासाठी आयआयटी मुंबईने (IIT-Bombay) असं डिजीटल स्टेथोस्कोप तयार केलं आहे.
हा स्टेथोस्कोप तयार करणा-या टिमच्या एका सदस्याने याबाबत माहिती दिली. ” या डिजीटल स्टेथोस्कोपमुळे रुग्णापासून लांब राहूनदेखील त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील आणि ते रेकॉर्डही करता येतील. रुग्णाच्या हृदयाच्या गतीबाबतचा डाटा ब्लूटूथच्या मदतीने डॉक्टरांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी रुग्णाजवळ जाण्याची आवश्यकता नाही.
तर, टीमचे सदस्य आदर्श के. यांनी सांगितलं, या डिजीटल स्टेथोस्कोपमध्ये कानात लावले जाणारे 2 उपकरण एका ट्युबला जोडण्यात आलेत.
ही ट्युब आजार ओळखण्यात अडचण ठरणा-या आवाजांना हटवून फक्त शरीरातील आवाज पाठवतं. दुसरं म्हणजे हा स्टेथोस्कोप विविध आवाजांना वाढवून आणि फिल्टर करून त्यांना इलेक्ट्रॉनिक संकेतांमध्ये बदलण्यासाठी सक्षम आहे. हे संकेत स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर फोनोकार्डियोग्रामच्या रुपात दिसतो. त्यामुळे यामार्फत मिळणारी माहिती इतर डॉक्टरांनाही विश्लेषण आणि पुढील उपचारासाठी पाठवली जाऊ शकते. असेही आदर्श यांनी यावेळी सांगितलं.