

केळवे,शनिवार दि. 14 मार्च 2020 नूतन विद्या विकास मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, केळवे शाळेत कोरोना विषाणू विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची स्वच्छता कशी राखावी, संसर्ग कसा टाळावा या बाबत तज्ञ डॉक्टरांनी उपयुक्त माहिती देऊन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच शाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या सभेत प्राथमिक आरोग्य केंद्र, माहीम येथील आरोग्य अधिकारी डाँ. कल्पना मावची आणि त्यांच्या सहकार्यांनी कोरोना या घातक जीवघेण्या आजाराबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूचा सामना कसा करावा, शरीराची स्वच्छता कशी राखावी, आजाराची लक्षणे ह्या बद्दल माहिती देऊन नागरिकांना अनावश्यक प्रवास व सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात आले. केळवे गाव पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक मोठया संख्येने येत असतात त्यामुळे कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा प्रसार होण्याच धोका मोठ्या प्रमाणात संभवतो याची दक्षता म्हणून बाहेरून आलेल्या पर्यटकांची योग्य ती चौकशी करूनच त्याना हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा असे आरोग्य अधिकारी यांनी हाँटेल व रिसाँर्ट मालकांना सुचविले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात संस्थेचे अध्यक्ष श्री. विविध पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन राऊत, संस्थेचे कार्यवाह श्री.अशोक राऊत, श्री.निलेश चौधरी, श्री. भूषण सावे ह्यांचे महत्वाचे योगदान लाभले.