

वसई, दि. 06 (वार्ताहर) ः आदिवासी एकजूट संघटनेमार्फत आज आपल्या विविध मागण्यांसाठी वसई तहसीलदार कार्यालयावर उपोषण व बिर्हाडी आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंब आपल्या कोंबड्या, बकर्यांसह आदिवासी तारफा व ढोलकीच्या तालावर मोर्चा काढला होता. आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेरु सिया (वाघ) यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्च्याचे आयोजन करण्यातआले होते. यावेळी त्यांनी नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी मोर्च्याला सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकले व त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मोर्चेकर्यांनी प्रदीप मुकणे यांच्या नावाचा जयघोष केला. वसई तालुक्यातील आदिवासी, शेतकरी, मजूर, कष्टकरी कामगार हे लोक शेठ सावकारांच्या वाडी वस्ती मध्ये राहतअसून मजूरी करीत आहेत. त्याचबरोबर अनेक आदिवासी शासकीय तलावाच्या कडेला समुद्राच्या कडेला व खारटानामध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आदिवासी बांधव आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत. परंतु ग्रामपंचायत महापालिका हे नियमांच्या अटी व नियमांच्या जंजाळामध्ये अटकवुन त्यांना ना पाणी, घरपटट्टी, लाईट, शौचालय या मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहेत. तसेच तहसील कार्यालयामार्फत देखील त्यांना विविध दाखले मिळण्यासही विलंब होत असे. या मागण्यांबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांच्याशी चर्चा करुन निवेदनातील सर्व मुद्दे समजून घेतले व तहसील कार्यालयाशी संबंधित असणार्या मुद्द्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर निवेदनातील इतर मागण्या महापालिका ग्रामपंचायत यांच्याशी संबंधित असल्याने त्या पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवून देणार असल्याचे सांगितले. मोर्चेकर्यांशी समाधानकारक चर्चा झाल्याने मोर्च्याला स्थगिती दिली अशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेरु सिवा (वाघ) यांनी सांगितले. यावेळी मोर्चेकर्यांनी आदिवासींचा पारंपारिक तारफा नृत्य व लोकगीतांनी तहसील परिसर दणाणून सोडले होते.
