

मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परीषद निवडणुकीच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली. अर्नाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणाऱ्या आदिवासी एकजूट संघटनेने अखेरच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या अर्नाळा गटातील उमेदवार सौ स्वप्नाली परेश मोरे यांच्या प्रचारासाठी आज एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या. दुपारी ठिक २ वाजता अर्नाळा एसटी डेपो येथून सुरू झालेल्या या रॅलीत एस टी पाडा, फँकटरी पाडा, शंकर पाडा, अर्नाळा शांती नगर, बंती रोड, किल्ला रोड येथे चौक सभा घेण्यात आल्या. यावेळी शाहीर संदीप दोंदे व सहकारी यांच्या क्रांतिकारी गीतांचाही कार्यक्रम सादर करण्यात आला. रॅलीत सहभागी झालेल्या महिला व युवकांनी खांद्यावर लाल झेंडे घेऊन व हातात बॅट निशाणी उत्साहाने प्रचार केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे रॅली काढून संपुर्ण अर्नाळा गाव पिंजून काढला. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी सत्ताधारी पक्षांविरोधात घोषणा देत संपूर्णअर्नाळा दणाणून सोडला. रॅलीत आदिवासी एकजूट संघटनेचे अध्यक्ष कु. शेरू वाघ, संघटनेच्या उमेदवार सौ.स्वप्नाली परेश मोरे, सदस्य सौ कमल भूयाळ, जयेश कदम, सुशांत भुतकडे, आकाश लढे व लाल बावट्याचे कॉ. आदेश बनसोडे उपस्थित होते. अर्नाळ्यातील स्थानिक ग्रामस्थांचा या रॅलीला जोरदार पाठिंबा मिळाला.