ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ज्यांनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाच्या जोरावर भक्कम मांड ठोकली आहे. त्या लोकनेते, आमदार हितेंद्र ठाकूर ऊर्फ आप्पा यांचा आज एकसष्टीपूर्ती वाढदिवस ! अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या खासदार निवडणूकीत वसई विरार आणि येथील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा त्यांची मतांसाठी मनधरणी करायला येऊन गेलेल्या दिग्गज नेत्यांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला ! 2009 साली पालघर लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यावर पहिल्याच निवडणुकीत बविआने आपला खासदार निवडूण आणला. त्यावेळी एक खासदार आणि तीन आमदार आणि बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थां असे राजकीय बळ असतांना आणि सहज संधी असतांनाही मंत्रिपदाचा मोह दूर ठेवून, त्याऐवजी आपल्या मतदार संघात मोठ मोठया विकास योजना आणि निधी मंजूर करून घेण्यात आप्पांनी समाधान मानले. आज तर दोन दोन आमदार असलेल्या गटाला मंत्रिपदाची संधी लाभते आहे. आजही बविआकडे स्थानिक स्वराज्य संस्था, तीन आमदार आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखी मोठी सत्ता हाती असतांना, आ. ठाकूर राज्यातील सरकारला पाठींबा देऊन मंत्री वा सत्तापदांची अपेक्षा न करता आपल्या विभागात अधिकाधिक विकास योजना आणण्यावर भर देत आहेत. म्हणून आज त्यांच्या एकसष्टीपूर्ती वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीयांची गौरव समिती गठीत होऊन, पुढील सप्ताहभर विविध लोकोपयोगी उपक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या गौरव सोहोळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच हा सोहळा पार पडणार आहे. अश्या आप्पांबद्दल गौरव समितीचा एक घटक म्हणून चार शब्द....!

पालघरनजीकच्या माहीम येथे दि. 3 ऑक्टोबर 1961 रोजी हितेंद्र विष्णू ठाकूर यांचा जन्म झाला. हेच त्यांचे मूळ गांव असून, खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांचे मातृ-पितृछत्र दुर्दैवाने एकाच वेळी वीजेच्या झटक्याने हिरावून नेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते विरारला आपले काका, स्व. भास्करभाऊ ठाकूर यांच्याकडे आले. तेथे विरारचे सरपंच असलेल्या काकांकडून त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले. महाविद्यालयीन दशेतच त्यांनी वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने १९८८ साली राजकीय जीवनाची कारकिर्द सुरु केली. १९९० साली त्यांनी जनता दलाचे त्यावेळी विधानसभा गाजवणारे अभ्यासू आमदार डॉमनिक गोन्सालवीस यांचा पराभव करुन, ते वसई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर गेले. तेंव्हा या आमदाराचे वय अवघे २९ वर्षांचे होते. सद्या महाराष्ट्र विधानसभेत सहाव्यांदा आमदारकीची टर्म पूर्ण करीत असलेले बहुजन विकास आघाडीचे प्रमुख, लोकनेते हितेंद्र विष्णू ठाकूर हे आज ३ आक्टोंबर 2022 रोजी वयाची एकसष्टी पूर्ण करीत आहेत.

          सर्वाधिक  लोकसंख्या वाढीचा वेग आणि वाढत्या नागरिकरणाचा बोजा सहन करणाऱ्या वसई विरार या प्रांताचे आ ठाकूरांना अनभिषक्त सम्राट म्हणावे लागेल. त्यांनी सच्च्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर एकहाती स्थापन केलेल्या बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाने एक खासदार, तीन आमदार आणि देशात सर्वाधिक, विक्रमी बहुमत मिळविलेली वसई विरार महापालिका, वसई पंचायत समिती, ठाणे जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक  आणि वसई विकास सहकारी बँक अश्या सत्ता टप्प्या टप्प्याने काबीज करीत, मोठया राष्ट्रीय पक्षांच्या आधाराशिवाय आपला राजकीय आलेख वरचढ ठेवला आहे. राज्यात सद्या दोन आमदार असलेल्या गटालाही मंत्रिपद सहज मिळवता येते, हे आपण पाहतोच आहोत. मात्र आप्पांनी चालून आलेली मंत्रिपदाची संधी नाकारली आणि त्याबदल्यात आपल्या विभागासाठी मोठ्या खर्चिक योजना पदरात पाडून घेतल्या. आप्पांनी मोठेपणा आणि बेगडी प्रतिष्ठेकडे जाण्यापेक्षा आपला जिल्हा आणि मतदार संघातील विकास कामाना प्राधान्य मिळावे, हाच दृष्टिकोन ठेवला.... ! 

            आम्हा पत्रकार आणि आप्पा यांचे समीकरण फार जुळले नाही. कारण ते अनेकदा बोलून जातात, ओल्यासोबत सुकेही तुम्ही जाळत आलात म्हणून ! गुंडगिरी आणि दहशतवादाच्या (प्रत्यक्षात नसलेल्या) आरोपात त्यांना माध्यमातून अनेकदा ठेचले गेले. माध्यमातील रंगलेले चित्र कसे अतिशयोक्तीपूर्ण आहे, हे  बऱ्याचदा उघडे पडत गेले. तरी त्यांच्याकडून कधीच खुलासे आणि स्पष्टीकरणाचा प्रयत्न झाला नाही. त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री 1990 पासून असली, तरी पत्रकार म्हणून मात्र त्यांच्याशी सौम्य संघर्ष अनेकदा झाला. त्यांच्या आणि आमच्या (साहित्यिक, पत्रकार ) अनेकदा मैफिली रंगल्या, तसे खटकेही उडत आले. पण त्याचा त्यांनी बाऊ करून कधी सुडाचे राजकारण केल्याचा संकुचीतपणा केला नाही. प्रसिद्धी माध्यमात काम करणारांना "ठाकूर" हा मुद्दा कायम विविध निमित्ताने बातम्या देणारा सोयीचा घटक ठरत आला. अनेक बड्या संपादक मंडळींशी मैत्री जोपासत आलेल्या आप्पांचे पत्रकारांना बातम्यांचे खाद्य पुरवत, त्यांना अनेकाविध निमित्ताने सक्रिय ठेवण्यात असलेले मोठे योगदान आम्हाला नाकारता येणारे नाही. या बातम्या आणि विरोधकांच्या आरोपांना दिल्या गेलेली प्रसिद्धी सत्यतेच्या निकषावर किती खरी ठरली? हे सर्वच जाणतात. स्वतःचे कधीही काही झाकून न ठेवता, सवंग प्रसिद्धीचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. मी आहे, तसा आहे हीच त्यांची भूमिका कायम राहात आली. त्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांकडून काही सकारात्मक कामाच्या बातम्या जरूर पाठवल्या गेल्या असतील, पण निवडणूक काळातील पत्रकार परिषदा अपवाद वगळता आप्पांनी माझे अमुक छापा किंवा माझ्याबद्दल तमुक का छापले? असा मोठा वाद पत्रकारांशी कधी घातला नाही, याचे खरे तर खूप आश्चर्यही वाटते...!

        सहाव्यांदा विधान सभा निवडणुकीला, गेल्यावेळी समोरे जातांना हितेंद्र ठाकूर यांनी राज्यातील मातब्बर हस्तींच्या टोकाच्या नकारात्मक प्रचाराला संय्यमाने आणि कार्याच्या आधारावर उत्तर दिले. मतदान संपल्यावर आणि निकालापूर्वी त्यांनी आपण पुढील निवडणूक लढणार नाही, हे जाहीर केले. अर्थात या निवडणुकीत त्यांना आपल्या मतदारांची सहानुभूती नको होती, तर गुणत्तेवर विजयाची खात्री होती. आणि झालेही तसेच ते मोठ्या फरकाने विजयी झाले. कोरोना काळात तीन आमदार आणि मोठया फौजफाट्यासह ठाकूर परिवार आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सपाटून केलेले काम कुणाला नाकारता येणारे नाही.  त्यांनी वि वा महाविद्यालयामार्फत तालुक्यात आणलेली विविध विषयांच्या अभ्यासक्रमांची सुविधा आणि अनेक पाणी पुरवठा योजनांद्वारा निकाली काढलेली येथील पाणी टंचाई, कला क्रीडा महोत्सव, साहित्यिक उपक्रमांचा सतत राबता याबाबी त्यांच्या कारकिर्दीतील वैशिष्ट्ये ठराव्यात. 
       जनतेच्या सर्वच अपेक्षा आणि प्रश्न कधीच पूर्ण होत नसतात. त्या अमर्याद असतात. मात्र प्रचंड व्यस्ततेतही आप्पांचा मोबाईल कधी नॉटरीचेबल आल्याचे आठवत नाही. विरोधकांसह आलेल्या सर्वांना ते भेटतात. काम होणार नसेल, तर त्याला खोटी आशा दाखवली जात नाही. अनेकांची कामे मार्गी लागतात. सर्वांची होतातच असेही नाही, परंतु त्यांच्या निराकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न जरूर होतात. आप्पांच्या एकंदर राजकारणातील सात्विक समतोल राखण्यासाठी आता सौ प्रविणावहिणी सुद्धा अधिक वेळ देऊ लागल्या आहेत. आमदार द्वय क्षितिज आणि राजेश त्यांचे दोन हात बनून हा प्रचंड डोलारा सांभाळण्यास सहाय्य करीत आहेत. येथील राजकारण आणि समाजकारण यावर वाद-विवाद, चर्चा होत राहतील. त्यांच्या प्रत्येक मत वा भूमिकेशी आपण सहमत असूच, असेही नाही. त्यांच्याही हातून काही त्रुट्या झाल्या असतील, कदाचित 'आपले ते बाळ दुसऱ्याचे कारटे' हा स्वाभाविक मनुष्यदोष सुद्धा अपवादाने कधी घडला असेल. परंतू सुविद्य, सुशिक्षित आणि वास्तवाचे चांगले भान ठेवणारा वसई तालुका आप्पांच्या कर्तृत्व आणि करिष्म्यावर अद्यापही खूष आहे, हे नाकारणे धाडसाचे ठरेल. 
          आज हितेंद्र, अर्थात आप्पा यांच्या वयाची एकसष्टीपूर्ती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सर्वपक्षीय गौरव समिती गठीत होऊन, पुढील सप्ताहभर विविध समजहीतैशी कामांच्या उपक्रमांची रेलचेल वसईत आयोजित करण्यात आली आहे. आपले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या आयुष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतानाच, महापालिकेच्या माध्यमातून येथे मोठी आरोग्य सुविधा उभी करण्यात आली असली, तरी विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी जुळलेला स्नेह लक्षात घेता, त्यांच्या पाठपुराव्यातून शासनाकडून पालघर जिल्हा आणि वसई विरार प्रांतासाठी महामार्गालगत एखादे आधुनिक नि विविध सोयींनी सुसज्ज, तसेच सामान्याला उपचार घेणे सोयीचे होईल, असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विनाविलंब उभारले जावे, ही अपेक्षा व्यक्त करूया.....!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *