
आमदारांसह पालिकेच्या कृतीवर वसई-विरारकरांची नाराजी!

प्रतिनिधी
विरार- वसई-विरार महापालिकेच्या ‘आय’ प्रभागाने अनधिकृत म्हणून नोटीस पाठवलेल्या ‘मेहफिल’ या रेस्टॉरंटचा उदघाटन सोहळा चक्क आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांचीच उद्या बेकायदा बांधकामधारकांसोबत ‘मेहफिल’ रंगणार असल्याने वसई-विरार शहरातील अनधिकृत बांधकामांचा पालनपोषण करता कोण आहे? हे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत वसई-विरारकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वसई-कोर्ट रोड येथील व्हिकटर टॉवरमध्ये नव्याने बनत असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये वाढीव बांधकाम करण्यात आलेले आहे. रस्त्यावरील फूटपाथ व अंतर्गत बदल करून हे बांधकाम करण्यात आल्याने यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे.
याविरोधात जनसामन्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त व्हिकटर डिसोझा यांनी ६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘मेहफिल’ रेस्टॉरंट’चे मालक शोएब मिसाळ यांना पालिकेने या रेस्टॉरंटला दिलेल्या परवानगीची कागदपत्रे ७ दिवसांत सादर करण्याची नोटीस बजावलेली होती. मात्र मिसाळ यांनी ही कागदपत्रे सादर केली अथवा नाही, याबाबत पालिकेकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रभाग समिती ‘आय’चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान; ‘मेहफिल’ या रेस्टॉरंटचा उदघाटन सोहळा ६ डिसेंबर रोजी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे ‘मेहफिल’ रेस्टॉरंट पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमधील ज्या भागात वाढीव बांधकाम करण्यात आलेले आहे; तो भाग अद्याप जैसे थे असल्याने पालिका आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कृतीबाबत वसई-विरारकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील काही वर्षे वसई-विरार शहर पाण्याखाली जात आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे सत्ताधाऱ्यांच्या संमतीने होत असल्याचा विरोधी पक्षांचा सूर आहे. याच बांधकामांमुळे वसई-विरार शहर बुडत असल्याचे निष्कर्ष निरी-आयआयटीच्या अहवालातून काढण्यात आलेले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मागील वर्षी भरसभेत पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यांची ही आश्वासने यंदाही विवा कॉलेजच्या प्रांगणात बुडालेली वसई-विरारकरांनी पाहिलेली आहेत.
मागील दोन वर्षांत शहरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे वाढीस लागली आहेत. शहरातील रस्ते-फूटपाथ फेरीवाले आणि अन्य अतिक्रमणानी अतिक्रमित केले आहेत.
प्रशासकीय काळात तर शहरातील सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. अशा संकटकाळी सामान्य वसई-विराकरांना आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पक्षाचा आधार होता. पण तेच जर अनधिकृत बांधकाम धारकांसोबत ‘मैहफील’ रंगवणार असतील तर सामान्य जनतेला वाली तरी कोण? अशी आर्तता वसई-विरारकरांनी व्यक्त केली आहे.