
दोन पोलीस ठाण्यात ‘लॉकअप’ची कमतरता
नालासोपारा :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि ठाणे ग्रामीण मधील मिरा भाईंदर मिळून स्वतंत्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले. तसेच काही ठाण्यांचे विभाजन केल्याने ठाण्यांची संख्या वाढली. मात्र, अद्यापही दोन पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’ नसल्याने आरोपी ठेवताना पोलिसांची धावपळ होत आहे. तर एकाच पोलीस ठाण्यात महिला लॉकअप असल्याने उर्वरित आठ पोलीस ठाण्यांना महिला आरोपी ठेवण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहावे लागते. आयुक्तालयात सध्या विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, आचोळे, वालीव, पेल्हार, माणिकपूर, वसई असे नऊ पोलिस ठाणे असून आणखी काही नवीन ठाण्यांची निर्मिती होत आहे. मात्र, तुळींज आणि पेल्हार पोलीस ठाणे येथेच आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ नाही. त्यामुळे या पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपींना ‘लॉकअप’ नसल्याने इतर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते. काही वेळा ज्या पोलीस ठाण्यात आरोपींची संख्या जास्त असल्याने या दोन्ही पोलीस ठाण्यांना आरोपी ठेवण्यासाठी पंचाईत होते.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करणे, कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा ‘लॉकअप’ ला आणण्यासाठी दूर अंतरावरून आरोपींची ने-आण करावी लागते. यामध्ये जोखीम असते. दरम्यान, थोडा जरी निष्काळजीपण झाल्यास आरोपी पसार होण्याचीही भीती असते. यामुळे संबंधित ठाण्यात ‘लॉक अप’ असल्यास सोयीचे ठरते. मात्र, ठाण्यात स्वतंत्र ‘लॉक अप’ नसल्याने पोलिसांना कसरत करावी लागते. तुळींज आणि पेल्हार या भागातील आरोपी वालीव, नालासोपारा, आचोळा पोलीस ठाण्यात ठेवले जातात. पोलिस ठाण्यांना या कमतरतेचा त्रास सहन करावा लागत असून अटक केलेल्या आरोपींना कोठडीत ठेवण्यासाठी एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात फिरवाफिरव करावी लागत आहे. तर नऊ पोलिस ठाण्यापैकी एकमेव वसई पोलीस ठाण्यात फक्त महिला कैद्यांसाठी लॉकअप आहे. प्रत्येकवेळी एक वाहन, काही पोलिस आणि इंधनाचा वाढीव खर्च पोलिसांना सोसावा लागतो.
गुन्ह्यांची संख्या वाढतेय……….
नव्याने आयुक्तालय अस्तित्वात आले. आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या अधिक असल्याने ठाण्यासह चौकीचीही संख्या वाढली. दरम्यान, गुन्हेही वाढल्याने आरोपींची संख्याही वाढते. त्यामुळे अनेकदा पूर्वीची लॉकअप अपुरी पडतात. यामुळे पोलिसांना धावपळ करावी लागते. लॉकअप नाही, अधिकाऱ्यांना बसण्याची जागा नाही, पार्किंगची सोय नाही, मुद्देमाल ठेवण्याची जागा नाही, अशा अनेक गोष्टी काही पोलीस ठाण्यात निदर्शनास येत आहे.
क्रमांक पोलीस ठाणे पुरुष लॉकअप महिला लॉकअप
1) विरार – आहे – नाही
2) अर्नाळा – आहे – नाही
3) नालासोपारा – आहे – नाही
4) तुळींज – नाही – नाही
5) आचोळा – आहे – नाही
6) वालीव – आहे – नाही
7) पेल्हार – नाही – नाही
8) माणिकपूर – आहे – नाही
9) वसई – आहे – आहे
दोन पोलीस ठाण्यात लॉकअप नाही…………
आयुक्तालयात सध्या विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, आचोळे, वालीव, पेल्हार, माणिकपूर, वसई असे नऊ पोलिस ठाणे असून आणखी काही नवीन ठाण्यांची निर्मिती होत आहे. मात्र, तुळींज आणि पेल्हार पोलीस ठाणे येथेच आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ नाही. त्यामुळे या पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपींना ‘लॉकअप’ नसल्याने इतर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते.
वाहतूक खर्च आणि जबाबदारी वाढते………..
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करणे, कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा ‘लॉकअप’ ला आणण्यासाठी दूर अंतरावरून आरोपींची ने-आण करावी लागते. यामध्ये जोखीम असते. दरम्यान, थोडा जरी निष्काळजीपण झाल्यास आरोपी पसार होण्याचीही भीती असते. त्यामुळे वाहतूक खर्च आणि पोलिसांची जबाबदारी वाढते.