
वसई : वार्ताहर
चर्चमध्ये नियमित जाणे आणि प्रार्थना करणे इतकाच केवळ कॅथॉलिक श्रद्धेचा भाग नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवा पुरविणे हे ख्रिस्ती श्रद्धेचे तीन प्रमुख भाग आहेत, असे वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी येथे सांगितले.
वसई, बंगली येथील कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आर्चबिशप मच्याडो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून या हॉस्पिटलचे हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. राजीव शर्मा आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. चारूशिला पंडित उपस्थित होत्या.
आर्चबिशप डॉ. मच्याडो यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेला जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा मदतीचा हात पुढे करण्याचे कर्तव्य प्रत्येक ख्रिस्तीधर्मीयाचे आहे. देशात ख्रिस्तीधर्मीय किती टक्के आहेत, हे महत्त्वाचे नाही. सेवा पुरविण्याच्या श्रद्धेतून कोविड महामारीच्या काळात अनेक ख्रिस्तीधर्मीय व संस्था मदतीसाठी धावत गेल्या.
यावेळी कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलच्या सेवेत 40 वर्षे असलेल्या सुमारे 11 कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष रिचर्ड वाझ यांनी निरोलॉजी, कर्करोग यासारख्या आणखी जीवघेण्या रोगांवर या हॉस्पिटलमध्येच उपचार करता यावेत म्हणून विस्तार योजना कशी पूर्ण करता येईल, याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगितले.
हॉस्पिटलचे जनरल सेक्रेटरी युरी घोन्सालवीस यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. चारुशिला पंडित, डॉ. राजीव शर्मा, माजी आमदार डॉमिनिक घोन्सालवीस यांचीही यावेळी भाषणे झाली. उपाध्यक्ष थॉमस ब्रिटो यांनी आभार मानले.