नालासोपारा (प्रतिनिधी)-बहुजन विकास आघाडी व मित्रपक्षांनी उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ नालासोपारा पूर्वेकडे ७ ठिकाणी चौक सभा घेऊन मतदारां पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.यावेळी आ.क्षितीज ठाकूर,महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर उमेश नाईक,प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख,ब.वि.आ.चे शहर उपाध्यक्ष रमाकांत वाघचौडे, माजी नगराध्यक्ष राजेश रोडे, पक्ष पदाधिकारी आर्चिस पाटणकर, श्रीनिवास नायडू, प्रा.के.डी.शर्मा, महेश देसाई या मान्यवरांनी ठिकठिकाणी नागरिक व मतदारांशी थेट संवाद साधला.
आ.क्षितीज ठाकूर व महापौर रुपेश जाधव यांनी विरोधकांवर फारशा टीका टिपण्या न करता ब.वि.आ.ने महपालिकेच्या आधारे शहरात जी विकास कामं झाली, जी होत आहेत व जी प्रस्तावित आहेत यावर जोर देत माजी.खासदार व उमेदवार बळीराम जाधव यांचा प्रचार केला.
जेव्हा आपले खासदार होते तेव्हा केंद्र सरकारकडून मोठा निधी विविध विकास कामांसाठी आपल्याला मिळत होता.
त्या आधारेच महापालिकेने परिवहन सेवा, रस्ते रुंदीकरण, भूमिगत गटारे व जलनिःसारण व्यवस्था, मोठ्या खर्चाच्या पाणी पुरवठा योजना, महाजलकुंभ,जलवाहिन्या, वीज पुरवठा सुधारणा, अशी कामं शहरात होऊ शकली.चर्चगेट -डहाण लोकल, लेडीज स्पेशल लोकल,पाईप द्वारे गैस घरोघरी योजनेला चालना, नव्या उड्डाण पुलांच्या कामाला गती मिळाली.महापालिकेचे बजेट ३ हजार कोटी रुपये इथपर्यंत पोहचले मात्र आपले खासदार संसदेत नव्हते तेव्हा हेच बजेट १७०० कोटी असे घसरले. शहराच्या विकास कामांना खीळ बसली. नंतर युतीचे खासदार निवडून गेले. त्यांनी आपल्या मागण्या, आपले प्रमुख प्रश्न इकडे साफ दुर्लक्ष केले.ज्यांनी लाखभर सुद्धा निधी उपलब्ध करून दिला नाही ते युतीचे नेते आज आपल्याकडे मतं मागायला फिरतायेत.
विचारा त्यांना काय कामं केली तुम्ही आमच्यासाठी ? किती वेळा आपण मतदार संघात तोंड दाखवले?वसईला सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न का केले?गेल्या वर्षभरात या गावितांनी किती पक्ष बदलले ?
अशा अनेक मुद्दयांवर आ.क्षितीज ठाकूर, महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर उमेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महापालिकेने फार मोठे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. आपला परिसर जागतिक स्तरावरचे पर्यटण क्षेत्र बनविण्याचा आपला निर्धार असून आपण त्यात यशस्वी होऊ असा विश्वास आ.क्षितीज ठाकूर यांनी नगरसेविका कल्पना म्हात्रे यांच्या प्रभागातील सभेत व्यक्त केला.राधा नगर,सेवालाल नगर, पाच आंबा, महेश पार्क, शिर्डीनगर, संकेश्वर नगर, व आचोळे रोड या ठिकाणी या चौक सभा घेण्यात आल्या.प्रत्येक ठिकाणी नागरिक व मतदारांचा चांगला प्रतिसाद या सभांना मिळाला.प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी आम.क्षितीज ठाकूर यांना थेट आपले प्रश्न विचारले, आपल्या समस्या सांगितल्या. त्यावर त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली.वीज पुरवठा,रस्ते विकास, आणि प्रवासा बाबतीत बरेच प्रश्न होते. पाण्याच्या समस्या कुणी मांडल्या नाहीत.तर काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरु झाला म्हणून महापालिकेचे आभार मानले.
आपण आधी एकटे होतो.आज आपल्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, कम्युनिस्ट,शेकाप,आर.पी.आय.चा एक गट, ई.असे अनेक पक्ष आहेत.आपली ताकद वाढली, आपला विजय निश्चित होत असल्याचे दिसून येताच महायुतीने ‘रडीचा डाव’खेळत आपली शिट्टी ही निशाणी चोरली.सोन्या चांदीच्या दागिन्यांची, पैशाची, मोबाईलची चोरी होते पण या युतीच्या नेत्यांनी शिट्टी चोरली आहे. अशा दगाबाज व दलबदलू नेत्यांना दूर ठेवा आणि आपल्या शहरांचा विकास पूर्वीप्रमाणे व्हावा यासाठी ‘रिक्षा’या चिन्हापुढचे बटण दाबून महाआघाडीला विजयी करा असे आवाहन ब.वि.आ.नेत्यांनी केले.तुळींज, आचोळे रोड या भागात सर्वाधिक मतदार आहेत.त्यामुळे आ.हितेंद्र ठाकूर व प्रथम महापौर राजीव पाटील यांनी याच भागात अधिक लक्ष दिले आहे.केवळ दोन दिवसात महाआघाडीची नवी निशाणी रिक्षा घरघरात पोहचविण्याचे काम या भागातील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केले असल्याचा दावा बविआ कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *