
बाविसाव्या ‘लीलाई दिवाळी अंका’चे प्रकाशन संपन्न !



वसई, दि. 31(वार्ताहर)
मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य-कला जोपासण्यासाठी राज्यभर निघणारे दिवाळी अंक महत्वाची भूमिका बजावीत असून, नवा लेखक घडवितांनाच आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाचक टिकवून ठेवण्याचे काम दिवाळी अंकांची परंपरा करीत आली आहे. सांस्कृतिक चळवळीतील एक महत्वाचा घटक असलेल्या दिवाळी अंकांची आणि त्यांच्या वाचकांची संख्या काहीशी रोडावते आहे, तिच्या वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यंदाच्या बाविसाव्या ‘लीलाई दिवाळी अंका’चे प्रकाशन करतांना केले.
अंधेरी येथील जोशी यांच्या निवास्थानी रविवारी सायंकाळी एका छोटेखानी समारंभात जोशी यांच्या हस्ते ‘लीलाई’चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सौ ज्योती जोशी, ‘लीलाई’चे संस्थापक संपादक अनिलराज रोकडे, ‘लीलाई’च्या उपसंपादिका, तथा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ, गिरीश रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. उत्कृष्ट अभिनयाच्या कारकिर्दीसाठी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जोशी यांचा याप्रसंगी लीलाई परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या प्रतिकूल काळात अंक संपादित करणे एक आव्हान झाले असतांना अश्याही वेळी दर्जेदार अंक काढण्याबरोबरच, तो वेळेत प्रसिद्ध करण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल जोशी यांनी ‘लीलाई’च्या संपादक मंडळाचे कौतुक केले. लीलाईच्या गेल्या बाविस वर्षातील वाटचालीचा थोडक्यात आढावा रोकडे यांनी घेतला. लीलाई हा मातृस्मृतींना वाहिलेला भावनिक अंक असून, त्यात विविध वाङमय प्रकार हाताळतानाच दरवर्षी कला, अभिनय क्षेत्रासाठी एक स्वतंत्र भाग देण्यात येत असल्याचे ज्योती निसळ यांनी यावेळी सांगून, सर्वांचे आभार व्यक्त केले.