

वसई : भाजपा-शिवसेना व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार विजय पाटील यांच्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाचा प्रचाराचा शुभारंभ उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील हरय्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. भाजपा वसई रोड मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात अध्यक्ष उत्तम कुमार व भाजपा पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अजय सिंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच त्यांनी वसई स्टेशन येथील अंबाडी रोड भाजी मार्केटमध्ये आपला दौरा केला व तेथील व्यापार्यांची भेट घेतली. तसेच वार्ड नं. 85 येथील कृष्णाटाऊनशिप येथील निवडणुक कार्यालयासही त्यांनी भेट दिली व कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन देशात व राज्यात भाजपाने घेतलेले देश हिताचे निर्णय पोहोचवा व ते समजवून, पटवून द्या! असे आवाहन केले.
भाजपा वसई रोड कार्यालयात जय श्रीरामच्या नार्याने सुरुवात करत मार्गदर्शन करताना अजय सिंग यांनी, मला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आवर्जून पाठवले आहे. व तेथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा असे आदेश दिले आहेत. असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी बोलताना, जे शिट्टी वाजवून फिरत आहेत… त्यांचाच परिवार भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांना मतदान करणार आहे. वसईच्या जनतेला यावेळी तब्बल 4 ते 5 वेळा पाणी तुंबण्याचा सामना करावा लागला आहे. हे जनता विसरलेली नाही. यावेळी वरुणराजा ही विजय पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. जो मध्ये-मध्ये येऊन वसईच्या जनतेला आठवण करुन देतो आहे. असे ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे रितेश सत्यनाथ, रामानुजम, सिध्दार्थ इस्सार, बाळा सावंत, सांदेश मरब, रमेश पांडे, अखिलेश मिश्रा, नागेश शेट्टी, कांचन जहा, राजेश सिंग आदी पदाधीकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.