लवकरात लवकर दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज यंत्रणांच्या झालेल्या नुकसानीची व यंत्रणेच्या पुर्नउभारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी सकाळी वादळामुळे बाधित झालेल्या भागाला भेट दिली. उद्या सकाळपर्यंत पालघरमधील वीज पुरवठा पूर्ववत होईल असे यावेळेस त्यांना सांगण्यात आले.

उच्चदाब लाईन, रोहित्र पुर्नउभारणीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वसई मंडळातील कामन क्रीक येथील उच्चदाब वहिनीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी सकाळी केली. त्यानंतर शिरसाड फाटा येथील दुरुस्तीच्या कामाची पाहणी करताना त्यांनी थेट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे पोहचत चौकशी केली. पालघर शहरातील दांडेकर कॉलेज जवळ रोहित्र दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. ही कामे करताना काय अडचणी येत आहेत, विलंब कशामुळे लागतो याची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
या प्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, संचालक (संचालन) संजय
ताकसांडे, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर, वसईचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण उपस्थित होते.

” उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अव्याहतपणे दुरुस्तीचे काम सुरू आहे. पहाटे तीन वाजता अमरापूर फिडर सुरू करण्यात आला असून मनोर-वाडा फिडर दुपारपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करून सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,” असे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतही अग्रवाल यांनी पालघर जिल्ह्यातील विद्युत विषयक कामांची प्रगती स्पष्ट करणारे सादरीकरण केले.
पालघर मंडळातील वीज वितरण यंत्रणेला वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या सर्व वर्गवारीतील ३ लाख ७४ हजारपैकी ३ लाख ७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (२१ मे) सकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

चक्रीवादळामुळे ३८ उपकेंद्र, १८६ फिडर (वीजवाहिन्या), ५ हजार ०७३ वितरण रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी ८१५ गावांसह सर्व वर्गवारीतील ३ लाख ७४ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. उच्चदाब वाहिन्यांचे २४८ तर लघुदाब वाहिन्यांचे ३८९ विजेचे खांब कोसळले किंवा वाकले. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसात कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले. विपरीत परिस्थितीत अव्याहतपणे काम करून सर्वच ३८ उपकेंद्र, १८६ फिडर, ४ हजार १३५ वितरण रोहित्र दुरुस्त करून ३ लाख ७ हजार ३९४ ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला. उच्चदाब वाहिनीचे १३५ व लघुदाब वाहिनीचे १५३ वीजखांब नव्याने उभारण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *