

एक नंबरचं बटणच दाबणार, दोन नंबरचे धंदे आपण करतच नाही, असा मेसेज नालासोपारातील विधानसभा महायुद्धात महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या समर्थकांनी व्हायरल केला असतानाच आता प्रदीप शर्मा यांच्यासाठी विरार, नालासोपारात लागलेल्या कल्पक आणि मतदारांशी थेट संवाद साधणाऱ्या बॅनरमधून शर्मा आणि महायुतीची विकासकामांची व्हीजन समोर मांडण्यात आली आहे.
ठाण्यासारखी क्लस्टर योजना हवीय का? टैंकरमुक्त शहर आणि शुद्ध पाणी हवेय का? पूरमुक्त शहर हवय? सुसज्ज हॉस्पिटल हवेय का? आरामदायी मेट्रो प्रवास हवाय का? चांगले आणि मोकळे रस्ते हवे आहेत? असे कळीचे प्रश्न विचारत शिवसेनेने विरार, नालासोपारावासीयांच्या आजवरच्या घुसमटीला वाचा फोडली आहे. येथील रहिवाशांच्या अपेक्षांची पूर्तता शिवसेना नक्कीच करेल अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरार येथील सभेत गुरुवारी दिल्यानंतर रातोरात विकासकामांचा हा नवा मेन्यू प्रदीप शर्मा यांच्या लक्षवेधी बॅनरमधून समोर आला आहे.
गुरुवारी रातोरात सर्वत्र लागलेले या बॅनरवरील प्रश्न आणि थेट भाषा नागरिकांना त्यांचे मत इव्हीएम यंत्रणेवरील १ नंबरचे बटण दाबून प्रदीप शर्मा यांना म्हणजेच विकासाला देण्याचे आवाहन करत आहे. सुरुवातीलापासूनच प्रदीप शर्मा यांच्या विविध बैनरनी नागरिकांची उत्सुकता वाढवली आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला ‘चोर की पोलिस’ या बैनरच्या माध्यमातून त्यांची ‘जागा’ दाखवून देण्याचा सुरु झालेला प्रचार प्रवास आता ‘विकासकामां’च्या आश्वासनावर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांनीही कालच्या सभेत पोलीस तर तुम्हाला दिलाय, आता चोरांना पळवून लावायचं काम तुमचं, असे आवाहन येथील मतदारांना केले होते.
विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या पोस्टर, बॅनरशेजारीच प्रदीप शर्मा यांचे हे आश्वासक बॅनर झळकले आहेत. जे आजवर झाले नाही ते विरार, नालासोपारात घडवून संपन्न सोपारा, व्हायब्रंट विरार प्रत्यक्षात आणण्याचे व्हीजन यातून मांडण्यात आले आहे. दोन नंबरच्या धंद्यांबद्दल संताप, चीड असणारी येथील जनता एक नंबरलाच निवडेल हे निसंशय, असा आत्मविश्वास शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.