एकेका सदनिकेची चार चार ग्राहकांना विक्री करून कॅपकॉन व्हेंचर्सचे भागीदार राहुल कपाडिया, हेमराज माळी, ममता माळी यांनी लावला शेकडो ग्राहकांना चुना

2020 पासून सुरू होता फसवणुकीचा गोरखधंदा, प्रकल्पातील इतर इमारतींमधील सदनिकांच्या विक्रीवर परिणाम होऊ नये म्हणून दोन वर्षे लपवण्यात आला घोटाळा.

मौजे आगाशी येथील सर्वे क्रमांक 35/8 व सर्वे क्रमांक 36/1/9 या जागेवर सुरू असलेल्या एम. बारिया व्हाइट सिटी या टाऊनशिप प्रकल्पातील दौलत इम्पेरिया या चौदा मजली इमारतीमधील अनेक सदनिकांची बनावट व बोगस कागदपत्रे तयार करून सुमारे तीन ते चार वेगवेगळ्या ग्राहकांना विक्री केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे. सदर प्रकरणी सर्वसामान्य ग्राहकांची व शासनाची फसवणूक केलेबाबत संबंधित विकासक आणि या गुन्ह्यात संगनमताने सामिल असणाऱ्या इतर सर्व आरोपींच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरिता अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आलेली आहे.

आगाशी येथे एम बारिया व्हाइट सिटी या नावाने सुमारे 100 करोड रुपये बाजारमूल्याचा एकूण 336 सदनिकांचा टाऊनशिप प्रकल्प सुरू आहे. सदरच्या प्रकल्पाकरिता आगाशी येथील विकासक श्री मोरेश्वर कृष्णा बारिया यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून VP – 5299 अन्वये बांधकाम परवानगी प्राप्त केलेली असून या प्रकल्पातील 22,320 चौरस फूट जागेवर पालिकेने मंजूर केलेल्या लेआऊट प्लॅन प्रमाणे सुमारे 64,000 चौरस फूट एफ.एस.आय. एवढे क्षेत्र विकासक श्री. मोरेश्वर कृष्णा बारिया यांनी नोंदणीकृत विकसनकरारनाम्याद्वारे कॅपकॉन व्हेंचर्सचे भागीदार श्री. राहुल भरत कपाडिया, हेमराज माळी, ममता माळी यांना विकास करण्यासाठी दिलेले आहे.

मात्र कॅपकॉन व्हेंचर्सचे भागीदार श्री. राहुल भरत कपाडिया, हेमराज माळी, ममता माळी यांनी बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित प्रकल्पातील एकेका सदनिकांची सुमारे तीन ते चार वेळा केल्याचे उघडकीस आल्याने या प्रकल्पात घर घेतलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना एकच धक्का बसला आहे.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी श्री हेमराज माळी व त्याची पत्नी ममता माळी हे राजस्थान येथे पळून गेलेले असून कॅपकॉन व्हेंचर्सचे मुख्य प्रवर्तक भागीदार श्री राहुल कपाडिया हे मुंबईतून फरार झाले आहेत. या प्रकरणात अजूनही काही मोठ्या धेंडांचा समावेश असल्याची वंदता आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याने अर्नाळा सागरी पोलीस आता या गुन्ह्याचा तपास कसा करणार आणि गुन्हेगारांच्या मुसक्या किती लवकर आवळणार याच्याकडे तमाम वसईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *