

वसई-लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या गुंतवणूकीच्या सुरस योजना आखून ऑनलाइन आर्थिक गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश टोळीचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अजय पंडित व रफिक शेख या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २ लॅपटॉप,८ स्मार्टफोन,मेमरी कार्ड,३ सिम कार्ड,महिंद्रा एक्सयुव्ही कार, आरोपींनी स्थापन केलेल्या रुद्रा सोल्यूशन कंपनीचे पॅनकार्ड,विविध बँकेचे वेगवेगळ्या इसमांच्या नावाचे २५ एटीएम कार्ड तसेच विविध बँकेचे ३३ धनादेश जप्त केले आहेत.लॉकडाऊन काळात वसई विरार मध्ये ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटनात लक्षणीय वाढ झाली होती. दरम्यान अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.तसेच ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन यासंबंधी गुन्ह्याची उकल करण्याच्या सुचना जारी केल्या होत्या.त्या अनुषंगाने या ऑनलाइन फ्रॉड चा छडा लावताना वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.या दोन्ही आरोपींविरोधात अनेक राज्यातही ऑनलाइन फ्रॉड प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दोन्ही आरोपी गरजू व गरीब नागरिकांच्या आर्थिक विवंचनेचा फायदा घेऊन त्यांना २०/२५ हजाराचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात त्यांचे बँकेत बचत खाते उघडून द्यायचे.त्या नंतर या नागरिकांचा वैध कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड प्राप्त करून हे मोबाईल नंबर बँकेच्या नेट बँकिंग सुविधा ,ओटीपी मिळविण्यासाठी तसेच बँकेच्या विविध बँक व्यवहारासाठी वापरायचे.अशा प्रकारे कागदपत्रे व सिमकार्डच्या माध्यमातून या दोन्ही आरोपींनी अवैध मार्गाने मोठया रकमा बोगस नागरिकांच्या खात्यात वळवायचे.तसेच ही सर्व खाती स्वतःच हाताळून ऑनलाइन फ्रॉड हे दोन्ही आरोप करीत होते.या कामात आरोपी अजय पंडित याचा छोटा भाऊ अभय पंडित व त्याचा मित्र अविनाश दास मदत करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.या दोघांनी कोलकाता येथील सॉल्टलेक येथे बेकायदा कॉलसेंटर चालू केले होते. या कॉलसेंटरच्या माध्यमातून ते लोकांना संपर्क साधत व त्यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जमीनीची मागणी करून त्यापोटी मोठया रकमेचे मासिक भाडे देण्याचे खोटे आश्वासन देत.व त्यानंतर नमूद मोबाईल टॉवर उभारणीच्या व्यवहाराकरिता आगाऊ ठराविक रक्कम भरण्याकरिता उपयुक्त करून अग्रीमेंटच्या रकमा बेकायदा सक्रिय केलेल्या विविध बँक खात्यात भारावयास सांगून नागरिकांकडून पैसे लाटायचे.अशा प्रकारच्या घटनांत वारंवार वाढ होत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी आपल्या खबरीमार्फत माफीत मिळवून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.सदरची कारवाई पोलीसअधीक्षक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वसईचे
अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या सूचनेनुसार वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या निगराणी खाली वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पो.निरीक्षक फडतरे,पोलीस हवालदार रविंद्र पवार,मुकेश पावर,मनोज मोरे,पोलीस नाईक राजेंद्र फड,अनिल सोनवणे,सतीश गांगुर्डे, पोलीस शिपाई बालाजी गायकवाड,स्वप्नील तोत्रे,सचिन वळीद यांच्या पथकाने पार पाडली.
.