
पालघर,प्रतिनिधी,- कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन विषाणूमुळे जगभर संकट उभे राहत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आठ रुग्ण या विषाणूचे सापडलेले आहेत. त्यामुळे देशभरासह राज्यातही या विषाणूने शिरकाव करायला सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटे पेक्षा ओमायक्रोनची येणारे तिसरी लाट ही महाभयंकर असणार आहे असे काही शास्त्रज्ञ व तज्ञां मार्फत सांगितले जाते. मात्र प्रसार रोखण्यासाठी मास्क चा वापर व अंतर नियमा सह कोरोनाच्या नियमावली पाळल्यास या विषाणूची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचपणी सुरू आहे. त्यातच आरोग्य विभाग अशा सर्व नागरिकांवर लक्ष ठेवून आहे. आरोग्य विभागाने अँटिजन टेस्ट किट सह rt-pcr तपासणी आदी बाबींची याआधीच तजवीज करून ठेवलेली आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती ओढावली तर त्यावर मात करता येणे शक्य आहे.
जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुरू असलेल्या कोरोना उपचार केंद्रांना पुन्हा पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयांमधून काही रुग्णालयमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आई सी यु बेड, लहान मुलांसाठी स्पेशल कक्ष आणि विलगीकरण कक्ष अशी सुविधा उपलब्ध केली गेली आहे. तर काही रुग्णालयमध्ये ऑक्सिजन व वेंटीलेटर तसेच विलगीकरण कक्षाने सुसज्ज आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता प्रत्येक उपचार केंद्राच्या ठिकाणी स्वयंचलित ऑक्सिजन प्लांट बसवला गेला आहे. या माध्यमातून आवश्यक असलेला ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोचवता येणे शक्य आहे. याचबरोबरीन लिक्विड ऑक्सिजनसाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.
सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण करून त्यांना त्या प्रकारानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवली जाण्याची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. याचबरोबरीने प्रत्येक उपचार केंद्रांमध्ये आवश्यक डॉक्टर्स, रुग्णवाहिका, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, औषधे, येणार आहेत.कोरोनाची लागण होणाऱ्या गर्भवती महिलांसाठी ही विशेष कक्ष स्थापन केला जात आहे. नागरिकांचा व रुग्णांचा शासकीय रुग्णालयात कडे येण्याचा कल लक्षात घेता आवश्यक पडल्यास आणखीन काही रुग्णालय अधिग्रहित करून त्यांना करून उपचार केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची आहे.
राज्य शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन पालघर जिल्हा करत असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे याच बरोबरीने या पूर्वी स्थापन केलेल्या रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहे. वेळ पडल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून रुग्णांच्या समन्वयासाठी व उपचारांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी व रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लस तितकीच आवश्यक असल्याने नागरिकांनी शक्य तितक्या लवकर आपले लसीकरण पूर्ण करावे व ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरण करून घेतलेले नाही अशांनी तातडीने लसीकरण करावे ज्यामुळे कोरोना ला दोन हात दूर ठेवण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी वारंवार केले आहे.तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता नागरिक स्वतःहून लसीकरण केंद्रांवर येऊन लस घेत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण जिल्हाभर दिसत आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयातील स्थिती
क्वारंटाईन बेड – 2715
ऑक्सिजन बेड – 665
नॉन व्हेंटिलेटर बेड – 84
व्हेंटिलेटर बेड – 86
एकूण बेड – 3550
सीसीसी (कोविड केयर सेंटर) – 21
बेड क्षमता – 2500
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर
डिसीएचसी – 15
रुग्ण क्षमता – 720
ऑक्सिजन बेड – 505
बालकांसाठी ऑक्सिजन बेड – 30
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल
डिसीएच – 3
रुग्णक्षमता – 330
व्हेंटिलेटर बेड – 86
नॉन व्हेंटिलेटर बेड – 84
आयसीयू बेड – 170
ऑक्सिजन बेड – 160
नागरिकांनी वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. मास्क वापरावा व लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयांशी संपर्क साधावा. भविष्यात येणारा धोका टाळण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे – वैदेही वाढाण,अध्यक्षा,जि.प.पालघर
संभाव्य धोका टाळण्यासाठी आपण त्रिसूत्री नियमांचे पालन करूया. स्वतःची काळजी स्वतः घेण्यासाठी हयगय करू नका. वेळीच धोका लक्षात घेऊन त्यावरील उपाययोजना आधीच करणे कधीही योग्य आहे. आरोग्य विभाग येणारा धोका रोखण्यासाठी सक्षम आहे – ज्ञानेश्वर सांबरे,उपाध्यक्ष तथा सभापती,आरोग्य विभाग,जि.प.पालघर
शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व उपचार केंद्रे यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विषाणूबाबतीत व त्याच्या प्रसार होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आरोग्य विभाग कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देत आहोत.
डॉ. दयानंद सूर्यवंशी,जिल्हा आरोग्य अधिकारी