


प्रतिनिधी : दिनांक २६ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शासनाच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन आपल्या घरी बसूनच शांततेत निष्ठेने व प्रामाणिकपणे यशस्वी केले. पालघर जिल्ह्यातून जवळपास हजाराहुन अनेक प्राध्यापक बंधू भगिनिनी आपला सहभाग नोंदवला. राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तसेच काही मागण्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन देखील अंमलबजावणी केली नाही. गेल्या वीस वर्षाच्या पासून विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या कनिष्ठ प्राध्यापकांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने विधिमंडळात घेतला असतानाही अर्थसंकल्पात तरतूद करून देखील वीस टक्के अनुदानाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. राज्यात जवळपास १० ते १२ हजार कनिष्ठ महाविदयालयाचे प्राध्यापक उपाशीपोटी विनावेतन काम करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे. अशा परिस्थितीची जाणीव असतांना देखील प्राध्यापकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. दुर्देवाने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने २० टक्के अनुदान देण्याचा तात्काळ निर्णय घ्यावा तसेच मंत्रालय स्तरावर अघोषित महाविद्यालयांना अनुदानासाठी घोषित करावे, आय. टी. विषयाला अनुदान द्यावे अशा अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेचे शासनादेश त्वरित निर्गमित करावेत म्हणून हे एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर पायाभूत पदांना मंजुरी देणे,, २०१२ नंतरच्या नियुक्त शिक्षकांना मान्यता देणे, कोरोना पार्श्वभूमीवर कार्यरत शिक्षकांना संरक्षण किंवा विमा संरक्षण देणे अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा यांच्याद्वारे मा. मुख्यमंत्री आणि
मा. शिक्षणमंत्री यांना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रा.सुनील पूर्णपात्रे व सचिव प्रा.विलास खोपकर यांच्या स्वाक्षरीने ई मेलद्वारे निवेदन देण्यात आले