

दि.९ (मनोज बुंधे,पालघर) धाकटी डहाणू जि.प.गटातील वासगाव ग्रामपंचायत हद्दीत जि.प. च्या ३०५४ योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.परंतु सुमारे ६० लक्ष रुपये निधी खर्चून करण्यात येणारे हे काम अंदाजपत्रकात नमूद निकषांनुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे गावातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी एकत्र येऊन संबंधित ठेकेदारा विरुद्ध जि. प. पालघर कार्यालयात तशा स्वरूपाचा तक्रारी अर्ज दाखल केला. तसेच ही बाब त्या भागातील जि.प.सदस्य आणि शिवसेनेचे गटनेते जयेंद्र दुबळा यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी ह्या प्रकाराची त्वरित दखल घेऊन कारवाईची चक्रे वेगाने फिरवली व लागलीच बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सदर कामाचे ठिकाणी हजर राहून कामाचा दर्जा आणि स्थितीचा आढावा घ्यावा म्हणून जि.प. पालघर येथे संपर्क केला.
त्यानुसार आज सदर कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी जि.प.पालघर चे अभियंता हनुमंत कांबळे हे हजर होते.
रस्ता दीर्घकाळ टिकणारा आणि योग्य मोजमापाचा होणे अतिशय आवश्यक आहे तसे न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी संबंधित ठेकेदारास दिला.या ठिकाणी जनतेची कामे उत्तम आणि जलदगतीने व्हावीत म्हणून नेहमी आग्रही असणारे गटनेते जयेंद्र दुबळा यांनी स्वतः जातीने हजर राहून हा विषय हाताळला या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, शासनामार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकासामांच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करीत असतात मात्र प्रत्यक्ष काम होतांना भ्रष्ट अधिकारी आणि बेईमान ठेकेदरांकडून होणाऱ्या मनमानी कारभारामुळे कामे निकृष्ट आणि तकलादू होतात व जनतेचा पैसा केवळ काही लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी खर्च होतो हे दुर्दैवी आहे.परंतु नागरिकांनी आणि लोकप्रतीनिधींनी जागरूक राहिल्यास यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत व कुणीही दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास जयेंद्र दुबळा ह्यांनी उपस्थितांना दिला.
या प्रसंगी वासगाव गावातील सतीश पाटील (माजी ग्रा.पं.सदस्य),गणेश कडू (ग्रा.पं. सदस्य),प्रतीक्षा राऊत (ग्रा.पं. सदस्य), व गावातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक सगळ्या बाबी परस्पर सहकार्यातून पूर्ण करू अशी भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.