
प्रतिनिधी:
वसई पूर्वेस कळंभोण येथील खदानामध्ये खदान माफिया स्फोट घडवून बेकायदेशीरपणे उत्खनन करीत असल्यामुळे स्फोटांमुळे जबरदस्त हादरे बसून परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरबाबत तहसील कार्यालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र तहसील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पूर्वेस कळंभोण येथे मोठ्या प्रमाणात वैध तसेच अवैधरित्या खदाने चालवून खदान माफिया महसूल प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीरपणे स्फोट घडवून उत्खनन करीत आहेत. या स्फोटांमुळे हादरे बसून परिसरातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. सदर बाबत महसूल प्रशासनाकडे असंख्य तक्रारी गेलेल्या असून प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे कळंभोण ग्रामस्थ चिंतीत आहेत. ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासनाविषयी कमालीची नाराजी आहे.
ज्या खदानांना परवानगी देण्यात आली आहे त्या खदान माफियांकडून शर्तीचे उल्लंघन होत आहे. परवानगीच्या आड बेकायदेशीरपणे ही उत्खनन केले जात आहे. स्फोटके वापरून उत्खनन करणे बेकायदेशीर असताना महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच देऊन खदान माफिया बेकायदेशीरपणे आणि बेधडकपणे कायद्याचे उल्लंघन करीत आहेत.
सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय, उप विभागीय अधिकारी, वसई तहसीलदार यांच्याकडे नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत कारवाई का झाली नाही याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तसेच खदान माफियांवर कायदेशीर कारवाई व्हावी.