
गाव मौजे निर्मळ, ता.वसई. जि.पालघर येथील निर्मळ विद्यालयालगत, शासकीय आणि ट्रस्टच्या जमीन मिळकतीवर कातकरी पाडा नावाने सुमारे ३०० कुटुंबाची एक वस्ती अस्तित्वात आहे. बहुतांश आदिवासी, अनुसूचित जाती जमाती, बौद्ध अशा कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या समाजाची ही वस्ती गेली अनेक वर्षे अस्तित्वात आहे.
या वस्तीमध्ये काही असामाजिक आणि गुन्हेगारी तत्व असलेली काही मंडळी हे तेथे बेकायदेशीरपणे दारू, बिअर, हातभट्टीची दारू, गुटखा, अमली पदार्थ अशा अनेक आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तुंची विक्री करीत असतात. त्यामुळे अनेक तरुण वर्ग तसेच अनेक गोरगरीब कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी या लोकांनी काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे केलेली आहेत आणि त्यामध्ये ते अशा वस्तुंची विक्री करीत आहेत. वास्तविक पाहता तेथे निर्मळ विद्यालय ही शाळा असून आणि पंचायत समितीच्या वतीने चालणारी अंगणवाडी ही अस्तित्वात आहे. या अंगणवाडीच्या लगतच एक अनधिकृत बांधकाम असून त्यामध्ये एक इसम वरील वस्तूंची खुलेआम विक्री करीत असतो. तसेच निर्मळ विद्यालयाच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम केलेले असून त्यामध्ये सुद्धा हाच इसम अनेक वरील वस्तूंची विक्री करीत असतो. यामुळे अनेक इसम दारू पिऊन कधी पडलेल्या अवस्थेत, तर कधी झोकण्याच्या अवस्थेत आढळून येतात याचा विपरित परिणाम बालकांच्या, विद्यार्थ्यांचा आणि महिलांच्या मनावर होत असून त्यामुळे वस्तीतील सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. एवढेच नव्हे ते आपल्या या बेकायदेशीर धंद्याची वाच्छयता कोणी करू नये म्हणून विक्रीतून मिळणाऱ्या अमाप पैश्यामुळे सदरहू इसम हा वस्तीत सुप्त दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग अनेकदा तो बाहेरील संस्था आणि त्याचे पदाधिकारी यांचे सहकार्य घेतो त्यामुळे तेथे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून त्याचे अतिशय गंभीर परिणाम तेथे वास्तव्य करणाऱ्या कुटुंबावर आणि समाज मानसावर होत आहे.
याबाबत अनेकदा तक्रार करूनदेखील तेवढ्या पूर्तीच कारवाई होते आणि पुन्हा तोच व्यवसाय त्याच ठिकाणी सुरु होतो. विशेष म्हणजे शाळा आणि मंदिर हे अतिशय लगत असूनसुद्धा त्याबाबत शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येते. ज्या अनधिकृत बांधकामामध्ये हे व्यवसाय चालतात ती अनधिकृत बांधकाम निष्काशीत करने तसेच हा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करून बेकायदेशीरपणे दारू, बिअर, हातभट्टीची दारू, गुटखा, अमली पदार्थ अशा अनेक आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तूंची विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी अशी मागणी त्या पाड्यातील नागरिकांची विशेषतः महिलांची आहे. याबाबत तात्काळ उचित कारवाई करून हा पाडा दारू व अनैतिक धंदे मुक्त करावा यासाठी मी वसईकर अभियानाच्या आदिवासी विकास परिषदेच्या महिला आघाडी विभाग प्रमुख श्रीमती अरुणा मुकणे यांनी यांनी मा.जिल्हाधिकारी पालघर, मा.पोलीस आयुक्त, मा.उप पोलीस आयुक्त वसई झोन-२,मीरा भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, मा.पोलीस निरीक्षक,वसई,मा.उपविभागीय अधिकारी, मा.तहसीलदार, वसई यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे. याबाबत अत्यंत तातडीने कारवाई न झाल्यास दि.५ जून २०२१ नंतर कधीही या मागणीसाठी त्या वस्तीतील महिला आणि नागिरक हो मा.तहसिलदार कार्यालय, वसई समोर धरणे आंदोलन करतील.


