

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वसई-विरार महानगरपालिकेमार्फत कोरोना लसीकरण मोहीमेला गती देण्यात येत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत आता ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरीकांना मोफत कोविड लस देण्यात येत आहे. मात्र कामणच्या विविध विस्तृत तथा डोंगराळ भागांतून वालीवपर्यंतच्या प्रवासात लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता कामण येथील आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक सुनिल आचोळकर यांनी आयुक्तांना केलेली आहे.
सद्यस्थितीत कामण परिसरातील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील व्याधी असलेल्या नागरीकांना कोवीड लसीकरणासाठी वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, वालीव, वसई (पुर्व) येथे वळसा घालून जावे लागत आहे. बहुतांशी वेळा वयोवृद्ध व व्याधीग्रस्तांसोबत एखादा कुटूंबिय किंवा सहकाऱ्यांलाही जावे लागते. कामण परिसर हा विस्तृत, डोंगराळ व लहान मोठ्या आदिवासी पाड्यानी बनलेला आहे. यामध्ये कामण, देवदल, तांबडमाल, पोमण, देवकुंडी, खोलांडे, नागले व लगतच्या परिसरांचा समावेश आहे. कामण ते वालीव हा रस्तेप्रवास जिकीरीचा असल्याने लाभार्थ्यांना वालीव येथील लसीकरण केंद्र गाठणे खर्चिक व वेळकाढू ठरत आहे. त्यामुळे लाभार्थी नागरीकांची गैरसोय होत असून त्यांच्या सुचना व तक्रारी प्राप्त होत आहेत.
मनपाचे कोरोना लसीकरण केंद्र कामण आरोग्य केंद्रात सुरू केल्यास लाभार्थी नागरीकांना विशेषत: आदिवासी पाड्यातील बांधवांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. तसेच जास्तीत जास्त लाभार्थी नागरीक पुढाकाराने या देशव्यापी लसीकरण मोहीमेत सहभागी होऊ शकतील, असे मत माजी नगरसेवक सुनिल आचोळकर यांनी व्यक्त केले.