

कामण येथील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक व ४५ वर्षांवरील व्याधी असलेल्या नागरीकांना कोवीड लसीकरणासाठी वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, वालीव, वसई (पुर्व) येथे जावे लागत होते. कामण क्षेत्र विस्तृत व डोंगराळ असून यामध्ये अनेक आदिवासी पाडयांचाही समावेश आहे. त्यामुळे कामण ते वालीव या लांबलचक प्रवासात येथील लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता कामण आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक सुनिल आचोळकर यांनी महानगरपालिका व पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. सदर मागणीनुसार येत्या सोमवार दि.१५ मार्च २०२१ पासून सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी ९.०० ते २.०० या कालावधीत कामण आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
कामण आरोग्य केंद्रात लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असल्याने जास्तीत लाभार्थी नागरीकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेण्याचे व गर्दी न करता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन माजी नगरसेवक सुनिल आचोळकर यांनी समस्त कामणवासियांना केलेले आहे.