

पालघर दि. 05- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नियम दिनांक 09/12/2013 प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम 4 (1) अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद आहे. या अधिनियमातील व्याख्येनुसार प्रत्येक शासकीय/निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था शाखा तसेच खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्था, इंटरप्राईजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य, सेवा किंवा वित्तिय युनिट, सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुयालये, क्रिडा संस्था, संकुले इत्यादी अशा सर्व आस्थापना/कार्यालयांमध्ये अंतर्गत समिती स्थापन होणे आवश्यक आहे.
अंतर्गत समितीची स्थापना कशी करावी याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 19/06/2014 मध्ये नमूद करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी आपल्या आस्थापनेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत समितीची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पालघर या कार्यालयास त्वरीत सादर करावी. या अधिनियमान्वये अंतर्गत समिती स्थापन न केल्यास 50,000 रूपये (अक्षरी पन्नास हजार रुपये) दंडाची तरतूद आहे. त्यानंतरही आपण वारंवार सुचना करुनही जर अंतर्गत समिती स्थापन केली नाही तर शासकीय यंत्रणा जे लागू असेल त्याप्रमाणे आपल्या कार्यालयाचे लायसन्स रद्द किंवा व्यवसाय रद्द किंवा व्यवसाय पुढे ठेवण्यास मज्जाव करु शकते, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी केले आहे.
०००००
