प्रतिनिधी | पापडी | रविवार, १ जून २०२५

पापडी येथील ‘इन्फ्रा एंटरप्रायझेस’ या इमारतीसाठी तब्बल १००० ब्रास मातीचा अवैध भराव व उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात तलाठीमार्फत तहसिल कार्यालयात पंचनामा सादर करण्यात आला होता, आणि विकासकाला काम बंद करण्याचे स्पष्ट आदेश निवासी नायब तहसिलदारांकडून देण्यात आले होते. तरीही, आज रविवारचा सुट्टीचा दिवस ओळखून विकासकाने पुन्हा बिनधास्तपणे अवैध माती भराव व उत्खनन सुरू केले आहे.

विशेष म्हणजे, धोवळीचे तलाठी श्री. बंगर यांना याबाबत वारंवार सूचना देऊनही त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे टाळले आहे. यावरून असे स्पष्ट होते की तलाठी बंगर हे संबंधित विकासकाच्या सोयीचे काम करत असून, प्रशासनाच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

कारण, निवासी नायब तहसिलदारांनी स्वतः तलाठी बंगर यांना काम बंदीचे आदेश बजावण्यास सांगितले होते. मात्र तलाठ्यांनी ते आदेश संदिग्ध हेतूने दुर्लक्षित केले आहेत. हे प्रकरण प्रशासनातील अंतर्गत साठगांठीचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, हे अवैध उत्खनन आणि माती भराव सुरू असताना राजस्व विभागाचे डोळेझाक व भूमिगत हातमिळवणीचे संकेत मिळत आहेत.

राज्य शासन आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हे केवळ मातीचे नव्हे, तर कायद्याच्या बुडवाबुडवीचे प्रकरण आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *