

आधीच मयत झालेल्या रुग्णाची दोन दिवसानंतर दिली कुटुंबीयांना माहिती; शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे यांची तात्काळ कारवाईची मागणी
वसई : विशेष प्रतिनिधी : डॉक्टर म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप, मरणाच्या दाढेतून देखील सहिसलामत रुग्णाला बाहेर आणेल असा विश्वास नागरिकांना त्या डॉक्टारबद्दल असतो. मात्र हीच डॉक्टर मंडळी जेव्हा परमेश्वराऐवजी सैतानासारखी रक्तपिपासू निघतात तेव्हा डॉक्टरी पेशावरचा नागरिकांचा विश्वासच उडून जातो. असाच तळपायाची आग मस्तकात नेणारा प्रकार नालासोपार्यात उघडकीस आला आहे. येथील प्रख्यात रिद्धी विनायक रुग्णालयाकडून हा संतापजनक प्रकार घडला आहे. दाखल करूण घेण्यात आलेल्या रूग्णाला कोरोना झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्यानंतर त्याच रूग्णालयात सदर रूग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र रूग्णावर उपचार करेपर्यंत ते रूग्णाचा मृत्यू होईपर्यंत हॉस्पीटलने त्या रूग्णाच्या सामान्य कुटूंबियांकडून सुमारे साडे नऊ लाखांचे बिल उकळले. इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असतानादेखील दोन दिवसानंतर त्यांच्या कुटंबियांना त्यांच्या मृत्यूची खबर दिल्याचा संतापजनक प्रकार रिद्धी विनायक हॉस्पीटलने केला आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय?
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहीवाशी असलेल्या एका 55 वर्षीय रूग्णाला बरे नसल्याने त्यांना नालासोपार्यातील वाडीया रूग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर नालासोपार्यातीलच अलायन्स हॉस्पीटलमध्ये त्यांना नेऊन पुन्हा वाडीया हॉस्पीटलमध्ये चेकअपसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया होता. तद्नंतर त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना रिद्धी विनायक हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्यास सांगीतले. या रूग्णालयात वसई विरार महापालिकेच्या वतीने 80 खाटा कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सदर रूग्णाला दि. 7 मे 2020 रोजी उपचारास्तव दाखल केल्यानंतर त्या रूग्णाला उपचार खाजगी की महापालिकेकडून सुरू करावेत याची साधी विचारणा रूग्णालयातील डॉक्टरांनी केली नाही. सुरूवातीला रूग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालयाने 50 हजार रूपये घेतले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करत असताना त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी सदर रूग्णाच्या नातेवाईकांना अडीच लाख रूपये भरण्यास सांगीतले. यादरम्यान खबरदारी म्हणून सदर रूग्णाच्या कुटुंबियांना म्हाडा वसाहतीत क्वारन्टाईन करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या वडीलांची तब्बेत चांगली आहे, असे काही डॉक्टरांचे म्हणणे होते, तर काही डॉक्टर मात्र रूग्णाच्या तब्बेतीत काही सुधारणा नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सांगत होते. याचदरम्यान दि. 19 मे 2020 रोजी त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला असल्याचे रूग्णाच्या मुलाला सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनंतर सदर मुलगा रिद्धी विनायक हॉस्पीटलमध्ये गेल्यानंतर तेथील वॉर्डबॉयने त्यांना तुमचे वडील दोन दिवसांपूर्वीच मृत्त झाले आहेत, मग तुम्ही इतक्या उशीरा मृत्तदेह घेण्यास का आले? असा सवाल वॉर्डबॉयने विचारल्यानंतर झाला प्रकार सदर मुलाच्या लक्षात आला. आपली फसवणूक झाली असून वारंवार रूग्णालयाने त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप या मयत रूग्णाच्या मुलाने दरम्यान केला आहे. मुलाच्या मेडिक्लेमचा वापर करून सुमारे साडेनऊ लाख रूपये रूग्णालयाने उकळले. रूग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप दरम्यान होत असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मयत रूग्णाच्या कुटुंबियांकडून होऊ लागली आहे.
–हे तर चंबळच्या खोर्यातील डाकू. निदान चंबळच्या खोर्यातील डाकू श्रीमंतांना लुटण्याचे काम करत होते. आणि हे रूग्णालयातील डॉक्टर सर्वसामान्य गरीब रूग्णांना लुटण्याचे प्रकार करत आहेत. झाला प्रकार अत्यंत निंदनीय असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
दिलीप पिंपळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख