
वसई, दि.14(वार्ताहर ) वसई विरार शहर आणि संपूर्ण तालुक्यासाठी सर्वाधिक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या बंगली येथील सुप्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटल मध्ये दरदिवशी अकरा लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेला ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाचे उदघाटन आज केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचा आशीर्वाद विधी वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या पौरहित्याखाली संपन्न झाला. सुमारे रु.80 लाख खर्चाचा हा ऑक्सिजन प्लॉन्ट गुगल इंडियातर्फे देणगी म्हणून आणि पाथ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कार्यान्वयीत करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या अभावाने झालेल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेऊन, भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून गुगल इंडियातर्फे पाथच्या मदतीने संपूर्ण देशभरात ८० ऑक्सिजन प्रकल्प शासकीय आणि ट्रस्ट संचालित सामाजिक कार्य करणाऱ्या विविध रुग्णालयांना देऊ केले आहेत. त्यात महाराष्ट्रात 8 प्रकल्प देण्यात आले असून, पालघर जिल्ह्यात हा मान वसईतील कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटला रुग्णालयाचे विश्वस्त रोहन गोन्साल्विस यांच्या परिश्रमपूर्वक आणि चिवट पाठपुराव्यामुळे मिळाल्याबद्दल यावेळी घोन्सालवीस यांचे सर्वांनी कौतुक केले.तसेच हा उपक्रम येथे मिळवून देणाऱ्या पाथ सेवाभावी संस्थेच्या डॉ. जयेंद्र कासार आणि निलेश गंगावरे यांचा यावेळी खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या काव्यमय शैलीत काही प्रासंगिक चारोळ्या बोलून, केंद्रीय मंत्री आठवले यांनी आपल्या भाषणात पुढे , रुग्णालयातर्फे कोविड काळात देत आलेल्या योगदानाबद्दल, गरीब आणि गरजूंना माफक दरात, तसेच वेळप्रसंगी सवलतीत करण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल आणि रुग्णालयाच्या एकंदर सामाजिक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालयासाठी आपल्या खासदार फंडातून रुपये २५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र किंवा राज्य शासनाकडून रुग्णालय विस्तार वा विकासासाठी कोणत्याही मदत लागल्यास आपण स्वतः पाठपुरावा करू, असे आश्वासन सुद्धा यावेळी दिले. वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी यावेळी बोलतांना, ख्रिस्ती मिशनरी संस्था शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात करीत असलेल्या सेवाभावी कार्याचा आढावा घेतला. संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय कोविड उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच कोरोना काळात कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटल नुकसान पचवून रुग्णसेवा करीत आले. या वसईत देण्यात आलेल्या योगदानाचा संदेश आणि आमच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचवा, असे आवाहन डॉ. मच्याडो यांनी ना. आठवले यांना केले. यावेळी रुग्णालयाचे उपाध्यक्ष थॉमस ब्रिटो यांनी प्रास्ताविकात , करोना काळात २ हजार ५०० रुग्णांवर आतापर्यंत उपचार केल्याची माहिती दिली. त्यामुळे ४ कोटींचे आर्थिक नुकसान रुग्णालयांस झाले आहे. मात्र तरीही गरीब आणि गरजूंना माफक दरात उपचार देत असून पुढेही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राजेश पाटील यावेळी म्हणाले,तालुक्यातील दुरवर असलेल्या आमच्या ग्रामीण भागासाठी कार्डिनल हॉस्पिटल हे मोठया उपचारासाठी हक्काचे हॉस्पिटल असून, मी दे खील या रुग्णालयाचा रुग्ण आहे. सामाजिक जाणीव ठेवून वाटचाल करणाऱया या रुग्णालयासाठी आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितिज ठाकूर याच्यासह आम्ही तीन्ही आमदार शक्य आणि हवी ती मदत करण्यास कायम पुढे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. हा ऑक्सिजन प्रकल्प दिवसाला ११ लाख लिटर ऑक्सिजन पुरविणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे वर्षाला ३६ लाख रुपये वाचणार आहेत. या प्रकल्पातील ऑक्सिजन हा प्राथमिक तत्वावर रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात येणार असून पुढे गुगलच्या परवानगीने तो शहरातील इतर रुग्णांसाठी खुला करण्याचा प्रयत्न करू, असे विश्वस्थ रोहन गोन्साल्विस यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी महापौर प्रवीण शेट्टी व रुपेश जाधव, रुग्णालयाचे सचिव युरी गोन्साल्विस, माजी अध्यक्षा इव्हेट कुटिन्हो, ट्रेझरर जोसेफ दालमेत यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


