
काही माणसं जन्माला येतात ती फक्त जगण्यासाठी काही जग बदलण्यासाठी तर काही माणसं जन्माला येतात व्यवस्था परिवर्तनासाठी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा धगधगित निखारा मुठीत घेऊन अनेक जण निघाले समग्र समाजपरिवर्तनासाठी त्यापैकी विलास वाघ एक अतिशय महत्त्वाचं नाव
बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन जग बदलण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईत परिवर्तनाचे ध्येय घेऊन लढणारे विलास वाघ
विलास वाघ यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील मोराणे या गावी जन्म झाला . चार वर्षांचे असताना वडील आनंदा वाघ यांचे निधन झाले .आईने मुलांचा सांभाळ केला . मोळ्या विकून,शेत काम, काबाड कष्ट करून मुलांना शिकवलं. तत्कालीन परिस्थिती मध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार समाजात त्यांचा जन्म झाला. 1956 साली ते नववीत होते तेव्हा सहली करता ते दिल्लीला गेले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांची भेट दिल्ली येथे झाली. बाबासाहेब आंबेडकर यांचे पद स्पर्श करण्याचा त्यांना योग आला . बाबासाहेबांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा संदेश विलास वाघ यांना दिला आणि हा मौलिक संदेश घेऊन वाघ सर यांनी पुढे समता शिक्षण संस्थेची स्थापना केली. मोराणे येथे त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय सुरू केले.पुणे विद्यापीठ येथे त्यांनी प्रपाठक म्हणून प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग येथे नोकरी स्वीकारली.आंतरजातीय विवाह संस्थेत काम करत असताना त्यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केला तसेच शेकडो आंतर जातीय विवाह त्यांनी जवळ जवळ 40 वर्ष लावून दिले. त्या पाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा सिद्धांत त्यांनी प्रमाण मानला.आणीबाणी कालखंडात त्यांनी राष्ट्र सेवा दला सोबत अन्यायाविरुद्ध लढा दिला. नामांतराच्या लढ्यात, रिडल्स प्रश्नात त्यांनी सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून वैचारिक लढा दिला . आंबेडकरी चळवळीत त्यांनी वेळ देता यावा म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठ येथील नोकरीचा राजीनामा दिला . देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या अपत्याकरता पुणे येथे वसतिगृह सुरू केले ते याच कालखंडात. देवदासी आणि शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना आधार दिला कारण सरकारने या मुला करता समकालीन कालखंडात कोणती ही कल्याणकारी योजना आखली नव्हती मग या मुलांचे प्रश्न सोडवणे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. भटके विमुक्त साठी आश्रम शाळा त्यांनी धुळे आणि पुणे येथे बांधली आणि हजारो भटके विमुक्त समाजातील मुलांनी येथे आजवर शिक्षण घेतले आहे स्वतःची जमीन त्यांनी आश्रम शाळे करता दिली. पुणे विद्यापीठ येथील नोकरी सोडल्या नंतर झोपडपट्टीत राहात असताना त्यांनी सुगावा प्रकाशन सुरू केले . पुस्तिका पासून ते ग्रंथ तसेच सुगावा मासिक हा चाळीस वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे.बुद्ध , फुले,कबीर,शाहू , आंबेडकर आदीच्या विचारांनी प्रेरित ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले,आ. ह साळुंके,शरद पाटील, रावसाहेब कसबे आदी मान्यवरांची पुस्तके महत्वाची आहेत. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव असे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले आहे .बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पे बॅक टू सोसायटी मिशन हा दिलेला संदेश घेऊन प्रा विलास वाघ यांनी जिवन समाज कार्या साठी समर्पित केले.
विलास वाघ यांचे मोठे बंधू अडवोकेट माधवराव वाघ यांनी ही चाळीसगाव येथे शैक्षणिक संस्था स्थापन करून तसेच नामांतर, रिडल्स, मंडल आयोग या आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे.विलास वाघ यांचे पुतणे प्रा संदेश वाघ हे ही आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते आहेत .उषाताई वाघ यांनी विलास वाघ यांना खंबीर साथ दिली . विलास वाघ सर यांच्या बंधूंच्या कुटुंबातील वैशाली, विवेक, प्रज्ञा ,प्रशांत,सुनीता,मनीषा,अनिता, वर्षा,नंदिषा,किरण,ज्योती, राजी हे सरांच्या प्रमाणेच आंबेडकरी चळवळीतील समर्पित कुटुंब आहे.
प्रा विलास वाघ यांचे 25 मार्च रोजी कोरोना मुळे पुणे येथे निधन झाले त्यांच्या निधनाची दाखल महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी घेऊन त्यांना वृत्त वाहिन्यांवर मानवंदना दिली. त्यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त त्यांना अभिवादन.