

—– ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे
वसई, दि.23(वार्ताहर) बाळंत माता व त्यांच्या नवजात बालकास पौष्टिक आहाराची भेट देतांनाच मुलीच्या गर्भाचे रक्षण व्हावे आणि संवर्धन व्हावे, तसेच स्त्री-भ्रूण हत्या विरोधात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’ द्वारे चालविल्या जाणाऱ्या
“कन्या संतान बचानी हैं स्त्री-भ्रूण हत्या मिटानी हैं” या साप्ताहिक उपक्रमाचा 125 वा आठवडा शनिवारी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे अध्यक्ष, तथा वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांचे हस्ते साजरा करण्यात आला.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पदरमोड करून, तसेच काही देणगीदारांच्या सहकार्याने विविध सात मासिक उपक्रम राबविणाऱ्या वसईतील किंजल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर डी. एम .पेटिट हॉस्पिटल (सरकारी हॉस्पिटल) या ठिकाणी दि.११-०२-२०१७ पासून सुरू असलेल्या “कन्या संतान बचानी हैं,स्त्री-भ्रूण हत्या मिटानी हैं” या साप्ताहिक उपक्रमाला शनिवारी, दि.२२.०६.२०१९ रोजी 125 आठवडे पूर्ण झाले. त्यानिमित्त यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पौष्टिक आहाराचे वाटप यावेळी करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील अनुसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या प्रातविकात देऊन, सर्व पदाधिकारी,सदस्य आणि ट्रस्टच्या देणगीदारांचे आभार मानले.
सृष्ष्टीचे दर्शन दृष्टीने (मोफत मोतीबिंदूऑपरेशन), किंजल दिव्यांग आधार योजना(२५ लाभार्थी – मासिक अर्थसाहाय्य्य), किंजल कन्या शिक्षण आधार योजना(२५ लाभार्थी- मासीक अर्थसाहाय्य्य), शिक्षणाच्या दिशेने एक पाऊल(उपेक्षित शाळाबाह्य विध्यार्थ्यांना मदत ), किंजल रुग्ण-मित्र योजना ( प्रत्येक रविवारी मोफत आरोग्य शिबीर ), आपले जुने गरिबांचे सोने योजना( दुर्गम वस्तीत सेवाभावी कार्य), सैनिकांच्या खात्यात (मासिक २०००/- )आर्थिक मदत अश्या योजना कार्यरत असल्याचेही अनुसे यांनी सांगितले.
कन्येच्या रक्षणासाठी व त्यादृष्टीच्या जनजागृतीसाठी चालू केलेला हा सामाजिक उपक्रम सतत १२५ आठवडे सुरु राहणे हे केवळ क्रियाशील कार्यकर्त्यामुळे शक्य झाले असून आजच्या व्यवहारी जगात ही मोठी उपलब्धी आहे. हे ईश्वरी कार्य असून त्यासाठी संस्था कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार काढून, सर्वांनी एकसंघपणे संस्थेचे सेवाभावी कार्य निरंतर चालू ठेवावे,असे आवाहन रोकडे यांनी यावेळी बोलतांना केले.
या प्रसंगी किंजल चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याध्यक्षा श्रीमती लीला परेरा यांनी रुग्णसेवेची महती विशद करून, यातून मोठे आत्मिक समाधान मिळत असल्याचे सांगितले. ट्रस्टचे सचिव विलास चाफेकर, उपाध्यक्षा नम्रता नेवे, दिलीप प्रधान, ज्योती भोवड, अरुणा बापट, दीपाली महाजन, सदाशिव वेर्णेकर, किशोर देसाई आदी किंजलचा
सहपरिवार यावेळी उपस्थित होता.