

वसई,दि.6( वार्ताहर ) आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणाऱ्या ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, मुलींसाठी
“कन्या संतान बच्यानी हैं, भ्रूण हत्या मिटानी हैं” आणि “किंजल कन्या आधार योजना” या योजना सुरु आहेत. संत गोन्सालो गार्सीया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांच्या हस्ते कुमारी दिपाली अतुल सामंत ह्या कन्येला किंजल कन्या आधार योजनेने सन्मानित करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कन्येला-महिलेला समाजात मानाचे आणि मोलाचे स्थान मिळावे म्हणून किंजल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे “कन्या संतान बच्यानी हैं, भ्रूण हत्या मिटानी हैं” ही साप्ताहिक योजना गेली 126 आठवडे सतत सुरु असून “किंजल कन्या आधार योजने”द्वारे गरीबीतील मुलींना शैक्षणिक साहाय्यासाठी मदतीचा हात संस्थेने दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. विभुते यांनी गौरवोद्गार यावेळी काढले.
सन २०१९-२०२२ या शैक्षणिक ३ वर्षासाठी कन्याना लाभ मिळणार आहे. विविध शाळा, विद्यालय,महाविद्यालयातील २५ कन्यांची निवड करून त्यांच्या खात्यात तीन वर्षासाठी प्रत्येक महिन्याला ५००/- जमा करण्यात येणार आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक व अभ्यासात हुशार ह्या निकषाचे प्रामुख्याने पालन करण्यात आले आहे. सरकारी योजनेत देखील कन्येच्या शिक्षणाला महत्त्व दिले आहे. किंजल चॅरिटेबल ट्रस्ट देखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील अनुसे यांनी यावेळी सांगितले.
संस्थेच्या ईश्वरी-सेवेत क्रियाशील कार्यकर्त्यांचे, तसेच ज्यांच्या आर्थिक सहकार्यामुळे हा प्रवास सुरळीत सुरू आहे. त्या दानशूर बँकां, पतपेढींचे व व्यक्तींचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले.