‘भगवान उसका भला करे, तरे यांच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नाही,’ अशी प्रतिक्रिया देत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमदार विलास तरे यांना साभार निरोप दिला. रविवारी बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्या स्वामीनिष्ठेला पुन्हा एकदा तिलांजली दिली.
विलास तरे यांचा शिवसेना प्रवेश हा स्वार्थातून झाला आहे, अशी प्रतिक्रिया एकीकडे उमटली असताना तरे यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन शिवसेना प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे. तरे यांना शिवसेनेने ‘फोडले’, ‘बविआला धक्का’ अशा बातम्या आल्या तेव्हा साहजिकच सर्वांचे लक्ष होते, ते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिक्रियेकडे!
‘भगवान उसका भला करे, तरे यांच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नाही,’ अशी प्रतिक्रिया आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आली आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. खरे तर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून काही विशेष प्रतिक्रिया मिळेल, अशी अपेक्षा होती. किंवा तरे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकूर विचलित होतील, अशी अपेक्षा माध्यमांना होती.
विलास तरे शिवसेनेत प्रवेश करणार, याची कुणकुण महिनाभर आधीपासूनच होती. तरे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांनाही ‘मातोश्री’वरून थोडी कल्पना दिली गेली होती. शिवाय तरे बहुजन विकास आघाडी सोडणार, याबाबतची बित्तंबातमी आमदार हितेंद्र ठाकूर यांना असणारच. त्यामुळे विलास तरे यांच्या जाण्याच्या बातमीने त्यांना फारसा फरड पडला नाही. मुळात विलास तरे यांना बहुजन विकास आघाडीत आणून आमदारकीची फळे हितेंद्र ठाकूर यांनीच दिली होती. बोईसर मतदारसंघात विलास तरे यांचा स्वत:चा असा प्रभाव नाही. त्यामुळे या जागेवर बहुजन विकास आघाडी नवीन चेहरा देऊन विलास तरे यांची कसर भरून काढू शकते. म्हणूनच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिक्रियेमागे विशेष असा अर्थ दडलेला दिसतो.
आगामी निवडणुकांची दिशा कशी आहे, यावर बहुजन विकास आघाडी निर्णय घेत आली आहे. या विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप-शिवसेना बहुजन विकास आघाडीला हादरा देण्याच्या विचारात आहे. या सगळ्याचा ‘ट्रेलर’ मागील लोकसभा पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतून सर्वांनीच पाहिला आहे. शिवाय बहुजन विकास आघाडीतील अंतर्गत सुप्त बंडाळीची कल्पनाही आमदार हितेंद्र ठाकूर यांना आहे. या सगळ्याचा विचार करता आमदार हितेंद्र ठाकूर ‘बौद्धिक’ निर्णयापर्यंत पोहाचले असतील यात शंका नाही. ‘भगवान उसका भला करे’ अशी प्रतिक्रिया ते देतात, तेव्हा ‘भगवान अपना भी भला कर’ असे म्हणायला ते विसरणार नाहीत. म्हणूनच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या ‘या’ विधानात अनेक अर्थ लपलेले दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *