

ऐतिहासिक मांडवी कोट जिल्हा पालघर किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची दुर्गमित्रांची मागणी :खानिवडे,वार्ताहर:
नरवीर चिमाजी आप्पांच्या सन १७३७ ते १७३९ या कालखंडातील वसई मोहिमेचा साक्षीदार असणारा जंजिरे मांडवी कोट किल्ला सद्या वाढत्या अतिक्रमणात नामशेष होण्याच्या प्रवासाला लागला आहे. वसई विरार प्रांतातील मांडवी गावातील मांडवी तलावाच्या काठावर वसलेला मांडवी कोट किल्ला अत्यंत दुरावस्थेत असून सदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील दुर्गमित्रांच्या सहकार्याने गेली १६ वर्षे सातत्याने श्रमदान व संवर्धन मोहिमा आयोजित करून किल्ले वसई मोहीम परिवार संस्था मांडवी किल्ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजवर झालेल्या १०० हुन अधिक श्रमदान मोहिमा, ऐतिहासिक मूर्त्या संवर्धन मोहीम, इतिहास मार्गदर्शन सफर, दिपपूजन व मशाल मानवंदना, तोरण व गुढीपाडवा पूजन, वास्तुदेवता पूजन, वास्तूविशेष नोंदणी आराखडा मोहीम इत्यादी उपक्रमांच्या अंतर्गत परिवाराने मांडवी कोट जपला आहे. सद्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचस्थानिकांनी नवी लाकडी कुंपणे व नवीन झाडे झुडुपे लावण्याचा पराक्रम सुरू करून किल्ल्यावर अतिक्रमण करण्याचा चंग बांधला आहे. या सोबतच किल्ल्याच्या मागील अंगास असलेल्या बुरुजावर व भिंतींवर काही वर्षांत अतिक्रमणयुक्त घरे वाढीस लागल्याने शौचालय घाण व कचरा वाढीस लागलेला आहे. किल्ल्याच्या अंतर्गत भागात स्थानिक गरजेसाठी पाण्याची उंच टाकी बांधताना पुरातत्वीय अवशेषांची परिमाणे लक्षात न घेतल्याने किल्ल्याचे मूळ स्वरुप विस्कळीत झालेले दिसते. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत मांडवी कोटाच्या देवस्थान अर्थात ऐतिहासिक मुर्त्यांच्या ठिकाणी दारूबंदी, प्लास्टिक बंदीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला होता व त्यास चांगले यश प्राप्त झाले. सद्या वाढत्या अतिक्रमण विषयावर दुर्गमित्रांना अतिक्रमणकर्त्या कडून शिवीगाळ, धमकी, दमबाजी करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुरातत्वीय नियमाप्रमाणे किल्ल्याच्या आवारात १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नसूनही किल्ल्यावर मालकी हक्काप्रमाणे नवीन कुंपणे घालण्यात येत आहेत. स्थानिक पोलीस, ग्रामपंचायत प्रतिनिधी, स्थानिक अधिकारी, तहसीलदार, दुर्गमित्र संघटना इत्यादी वर्गानी सदर विषयावर वेळीच गंभीरपणे उपाययोजना न केल्यास मांडवी कोटाच्या परिस्थितीत अधिक प्रमाणात अडचणी निर्माण होत जातील. किल्ल्याच्या अंतर्गत भागात व किल्ल्याच्या नियोजित घेऱ्यात होणारे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमणयुक्त कुंपण, बांधकाम तत्काळ काढून भुईसपाट करण्यात येईल असे समस्त दुर्गमित्रांनी जाहीर केलेले आहे. मांडवी कोट किल्ल्यावर मालकी हक्क व अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी योग्य, खरी कागदपत्रे, उतारे सादर करावीत यासाठी दुर्गमित्र संघटना लेखी पाठपुरावा करीत आहेत. मात्र वरील घटनांमुळे समस्त दुर्गमित्र व प्रेमी नाराज झाले असून ऐतिहासिक महत्व असलेल्या या मांडवी कोट व पालघर जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक वस्तूंवरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी दुर्गमित्रांनी केली आहे . ऐतिहासिक मांडवी कोट अत्यंत महत्वाची ऐतिहासिक वास्तू असून सदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी अत्यंत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आलेला आहे. किल्ल्यावर होणारे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण दुर्गमित्र संघटना, अभ्यासक, संशोधक सहन करणार नाहीत.— आकाश जाधव — किल्ले वसई मोहीम परिवार प्रतिनिधी
ऐतिहासिक मांडवी किल्ल्यावर होणारे बेताल, बेमान अतिक्रमण रोखणे ही प्रत्येक दुर्गमित्राची जबाबदारी असून आगामी काळात सदर वास्तूच्या संवर्धनासाठी तीव्र लढा देण्यासाठी समस्त दुर्गमित्र संघटना एकत्रित होतील यात शंका नाही----प्रीतम पाटील --- युवा शक्ती प्रतिष्ठान