

विरार (प्रतिनिधी)दि.१६: केंद्रातील भाजपा सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा प्रखर विरोध करीत आज (दि.१६) वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली
वसई येथे तहसीलदार कचेरीसमोर निदर्शने केली. जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी राजा सुखावला होता. परंतु केंद्रातील मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले आणि पुन्हा घुमजाव करीत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे.
कांदा उत्पादन शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातीबंदीचा जाहीर निषेध करीत हा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी सकाळी ११.०० वाजता वसई तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांना तहसीलदार, वसई यांच्या माध्यमातून संयुक्त सहीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावून, सामाजिक अंतर राखत कोरोना महामारीच्या काळातील कायद्याचे पालन करत केंद्रातील भाजपा सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा प्रखर विरोध करीत आंदोलन केले. वसई विरार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुलदीप वर्तक, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रविणा चौधरी, कैफ़ खान आणि जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे कार्यकर्ते यांनी निदर्शने करीत आंदोलन केले.
