
पालघर तालुक्यातील केळवे-झांझरोळी धरणाच्या गळतीवर युद्धपातळीवर दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही या धरणासाठी कायमस्वरूपी दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलावीत असे निर्देश कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
धरणाच्या मजबुतीबाबत ऑडिट करून आवश्यक भासल्यास त्यादृष्टीनेही यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत असे भुसे यांनी झांजरोळी धरणाच्या पाहणी वेळी सांगितले. पालक मंत्री यांनी सकाळी सर्व यंत्रणासह झांझरोळी धरणाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे आदी उपस्थित होते. धरण परिसरातील नागरिकांनी उद्भवणार्या पाणी समस्येवर प्रकाश टाकत पालकमंत्री यांच्याकडे गाऱ्हाणे घातले. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा गावांतील प्रत्येक घराला लवकरच दिला जाईल असे आश्वासन भुसे यांनी गावकऱ्यांना दिले आहे.
माहिम केळवे धरनाच्या भिंतीचा काही भाग कोसळला होता. धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.सुरक्षा म्हणून एन डी आर एफ ची टीम तैनात करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखीखाली गळती प्रतिबंधक कामे वेळीच जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे होणारा अनर्थ टाळता आला असेही पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.सध्यास्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याच्या पर्यायाचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली.