वननिर्मितीचा एक अभिनय उपक्रम

केळवे: दि. ७ ऑगस्ट, २०२१

केळवे समुद्रकिनाऱ्याची वाढती धुप रोखण्यासाठी लोकसहभागातून केळवे समुद्र किनाऱ्यावर वननिर्मिती करण्याचा उपक्रम तेथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे, यासाठी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

“चला एक झाड लावूया.. पर्यावरण रक्षुया.. आपल्यासाठी” या घोषवाक्याने केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुद्रफळ’ आणि ‘कोनोकार्पस’ या वृक्षांच्या लागवडीचा उपक्रम दि. ऑगस्ट ६ आणि ७ तसेच दि. १४ आणि १५ या दिवशी हाती घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, परंतु गेल्या चार-पाच वर्षात आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाख्याने येथील सुरूची बाग उद्ध्वस्त झाली आहे तसेच सद्यस्थितीत असलेली सुरुची बाग समुद्र किनाऱ्याच्या धूप होत असल्याकारणाने वाचविणे आवश्यक आहे, अश्यातच केळवे समुद्र किनाऱ्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तेथील पर्यावरण प्रेमी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन केळवे पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करून लोकांना आवाहन केले आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यक्ती पुढे आल्या आहेत आणि त्यांनी हा केळवे समुद्र किनारा हिरवाईने पुन्हा नटविण्यासाठी हात पुढे केला आहे.

केळवे समुद्र किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी “मालकीचे एक रोपटे दत्तक घेण्याची सुवर्णसंधी” या योजनेअंतर्गत प्रति ५०० रुपये एक झाड ह्या योजनेच्या संकल्पनेला अनेक दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संकल्पना स्वीकारून केळवे समुद्र किनाऱ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढकार घेतला आहे.

किनाऱ्यावरील झाडांचे संगोपन करण्याची हमी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाने घेतली आहे. सदर समिती झाडांसोबतच त्यांची लागवड, ठिबक सिंचन व देखभाल खर्च सांभाळणार आहे, आणि महत्वाचे म्हणजे झाडांना दात्यांच्या नावाचा फलक झाडाच्या बुंध्याला लावण्यात येणार आहे.

समितीने नियोजन केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात किनार्‍यालगत धूप होत असलेल्या ठिकाणी समुद्रफळ, कॉनोकार्पस या दोन जातीच्या झाडांची लागवड करून धूप थांबवण्याचे नियोजन आहे. सदर कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना दांडेकर महाविद्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या स्वयंसेवक तसेच केळवे गावातील स्वंयसेवक हे दिमतीला असणार आहेत.

वृक्ष दत्तक योजनेतील लक्षवेधी

१)आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त झाड देऊन त्या झाडाला दत्तक घेण्याची संधी.

२) आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे दत्तक घेणे

३)झाडे लावण्याची इच्छा आहे पण जागेअभावी झाडे लावणे शक्य होत नाही अश्यांसाठी ही संधी

४)निसर्गाचे आपण काही देणे लागतो म्हणून आपण झाड दत्तक घेता येणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *